क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने आयोजित केलेल्या हिरो आय-लीग फुटबॉल स्पर्धेला कालपासून कोलकातात सुरूवात झाली. काल खेळविण्यात आलेल्या सामन्यांत आय-लीग स्पर्धेत पुनरागमन केलेल्या मोहमेडन स्पोर्टिंग क्लब तसेच मिनर्व्हा आणि चेन्नई सिटी एफसी संघांनी विजय नोंदविले.
कोलकातातील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात मोहमेडन स्पोर्टिंग क्लबने सुदेवा दिल्ली फुटबॉल क्लबचा एकमेव गोलने पराभव केला आणि विजयाचे पूर्ण 3 गुण कमविले. सामन्याच्या 58व्या मिनिटाला सुदेवा एफसीच्या बचावफळीतील खेळाडूंच्या चुकीमुळे मिळालेल्या संधीवर अली फैजलने विजयी गोल नोंदविला.
कल्याणी नगरपालिका मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात पंजाब फुटबॉल क्लबने विजयाची नोंद करताना ऍजोल एफसी संघाला त्याच फरकाने हरविले. सामन्याच्या 18व्या मिनिटाला निंगथौवजाम प्रीतम सिंगने पंजाब एफसीचा विजयी गोल नोंदविला. या विजयाने मिनर्व्हा संघाला 3 गुण मिळाले.
याच स्टेडियमवर प्रकाशझोतात खेळविण्यात आलेल्या सामन्यात चेन्नई सिटी एफसीने आरंभाच्या पिछाडीनंतर गोकुळम केरळ संघाचा 2-1 गोलांनी पराभव केला. डॅनी अँट्वीने तिसऱय़ाच मिनिटाला गोल करून गोकुळमला आघाडीवर नेले होते. त्यानंतर इल्वेडीनने पेनल्टीवर 27व्या मिनिटाला बरोबरी साधल्यानंतर दुसऱया सत्रात 50व्या मिनिटाला विजय नागप्पाने चेन्नईचा विजयी गोल केला व तीन गुण प्राप्त करून दिले.