आरसीबीचे आव्हान संपुष्टात, उद्या दुसऱया क्वॉलिफायरमध्ये दिल्ली कॅपिटल्स-सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने भिडणार
वृत्तसंस्था/ अबु धाबी
केन विल्यम्सन (44 चेंडूत नाबाद 50) व जेसॉन होल्डर (20 चेंडूत नाबाद 24) यांनी 7.5 षटकातच 65 धावांची अभेद्य भागीदारी साकारल्यानंतर सनरायजर्स हैदराबादने आयपीएल एलिमिनेटर लढतीत आरसीबीचा 6 गडी राखून धुव्वा उडवला आणि स्पर्धेच्या सेमीफायनलसदृश दुसऱया क्वॉलिफायर फेरीत धडक मारली. प्रारंभी, आरसीबीला 20 षटकात 7 बाद 131 धावांवर समाधान मानावे लागले तर हैदराबादने 19.4 षटकात 4 गडय़ांच्या बदल्यात 132 धावांसह विजयाचे लक्ष्य गाठले.
डावातील शेवटच्या षटकात हैदराबादला 9 धावांची गरज असताना होल्डरने खेचलेले 2 चौकार निर्णायक ठरले. विल्यम्सनने आपल्या अर्धशतकी खेळीत 2 चौकार व 2 षटकार तर होल्डरने 3 चौकार फटकावले.
वास्तविक, या लढतीत केवळ 7 बाद 131 धावा जमवल्या असल्याने हैदराबादने सहज विजय संपादन केला असता तरी त्यात आश्चर्याचे कारण नसते. पण, यानंतरही विराट कंपनीच्या गोलंदाजांनी काटेकोर मारा करत सामन्यात रंगत आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. केवळ शेवटच्या टप्प्यात विल्यम्सन व होल्डर या जोडीनेच त्यांना नेस्तनाबूत करण्यात अजिबात कसर सोडली नाही.
विल्यम्सन व होल्डर या जोडीने अभेद्य भागीदारी साकारताना प्रतिस्पर्धी कर्णधार विराटचे सर्व प्रयत्न अक्षरशः हाणून पाडले. ही जोडी फोडण्यासाठी त्याने हरसंभव प्रयत्न केले. पण, अंतिमतः या जोडीने त्यांनाच जेरीस आणले.
होल्डरचे 3 बळी
या लढतीत सनरायजर्स हैदराबादतर्फे जेसॉन होल्डरने 25 धावात 3 बळी घेतले तर त्याला टी नटराजनची (2-33) पूरक साथ लाभली. एबी डीव्हिलियर्सने समयोचित अर्धशतक झळकावताना 43 चेंडूत 56 धावा फटकावल्या व संघाला खराब स्थितीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्याच्या फटकेबाजीमुळेच आरसीबीला 120 धावांचा टप्पा सर करता आला.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर आरसीबीची पहिल्या 4 षटकातच 2 बाद 15 अशी दाणादाण उडाली. कर्णधार विराट कोहलीने तिसऱया स्थानाऐवजी सलामीला उतरण्याचा निर्णय घेतला. पण, तो 6 धावांवरच बाद झाला आणि आरसीबीसाठी हा जबरदस्त झटका ठरला. विराटने होल्डरच्या गोलंदाजीवर श्रीवत्स गोस्वामीकडे झेल दिला. होल्डरनेच पडिक्कलला देखील तंबूचा रस्ता दाखवला. पडिक्कलचा पूलचा प्रयत्न फसल्यानंतर प्रियम गर्गने सर्कलच्या आत त्याचा झेल टिपला आणि आरसीबीची 2 बाद 15 अशी दाणादाण उडाली.
जोश फिलीपच्या स्थानी संघात आलेल्या ऍरॉन फिंचने (30 चेंडूत 32) व डीव्हिलियर्स यांनी तिसऱया गडय़ासाठी 41 धावांची भागीदारी साकारली. पण, हे दोघेही 11 व्या षटकातच बाद झाले. प्रारंभी, फिंचने शाहबाजच्या गोलंदाजीवर अब्दुल समदकडे झेल दिला आणि एका चेंडूच्या अंतराने रशीद खानने मोईन अलीला थेट थ्रोवर धावचीत केले.
शिवम दुबे (8), वॉशिंग्टन सुंदर (5) स्वस्तात बाद झाले. त्यानंतर एबी डीव्हिलियर्सने 39 चेंडूत जेसॉन होल्डरच्या गोलंदाजीवर अर्धशतक साजरे
केले. पण, नटराजनने एका अप्रतिम यॉर्करवर दिग्गज फलंदाज एबी डीव्हिलियर्सचा त्रिफळा उडवला आणि आरसीबी संघाच्या उरल्यासुरल्या अपेक्षा देखील संपुष्टात आल्या.
सनरायजर्सतर्फे होल्डरने 25 धावात 3 तर टी. नटराजनने 33 धावात 2 बळी घेतले. नदीमने 30 धावांच्या बदल्यात एक फलंदाज बाद केला.
शेवटच्या षटकात काय घडले?
मध्यमगती गोलंदाज सिराजच्या शेवटच्या षटकात सनरायजर्सला 9 धावांची गरज असताना विल्यम्सनला पहिल्या चेंडूवर एकेरी धाव घेता आली तर होल्डरने दुसरा चेंडू निर्धाव घालवला. यामुळे, उर्वरित 4 चेंडूत 8 धावा, असे क्लिष्ट समीकरण हैदराबादसमोर उभे ठाकले. पण, यानंतर होल्डरने सलग 2 चेंडूंवर 2 चौकार फटकावत थरारक विजयावर शिक्कामोर्तब करुन दिले. होल्डरने यातील पहिला चौकार लाँगऑफच्या दिशेने तर दुसरा चौकार पॉईंटच्या दिशेने फटकावला आणि विराट व त्याचे सहकारी सीमारेषेच्या दिशेने जाणाऱया त्या चेंडूंकडे पाहत राहण्याशिवाय आणखी काहीही करु शकले नाहीत!
धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर : विराट कोहली झे. गोस्वामी, गो. होल्डर 6 (7 चेंडू), देवदत्त पडिक्कल झे. गर्ग, गो. होल्डर 1 (6 चेंडू), ऍरॉन फिंच झे. अब्दुल समद, गो. नदीम 32 (30 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), एबी डीव्हिलियर्स त्रि. गो. नटराजन 56 (43 चेंडूत 5 चौकार), मोईन अली धावचीत (रशीद खान) 0 (1 चेंडू), शिवम दुबे झे. वॉर्नर, गो. होल्डर 8 (13 चेंडू), वॉशिंग्टन सुंदर झे. अब्दुल समद, गो. नटराजन 5 (6 चेंडू), नवदीप सैनी नाबाद 9 (8 चेंडूत 1 चौकार), मोहम्मद सिराज नाबाद 10 (7 चेंडूत 1 चौकार). अवांतर 4. एकूण 20 षटकात 7 बाद 131.
गडी बाद होण्याचा क्रम : 1-7 (विराट, 1.2), 2-15 (देवदत्त, 3.3), 3-56 (फिंच, 10.2), 4-62 (मोईन, 10.4), 5-99 (दुबे, 15.4), 6-111 (वॉशिंग्टन सुंदर, 17.1), 7-113 (डीव्हिलियर्स, 17.5).
गोलंदाजी : संदीप शर्मा 4-0-21-0, होल्डर 4-0-25-3, टी. नटराजन 4-0-33-2, नदीम 4-0-30-1, रशीद खान 4-0-22-0.
सनरायजर्स हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर झे. डीव्हिलियर्स, गो. सिराज 17 (17 चेंडूत 3 चौकार), मनीष पांडे झे. डीव्हिलियर्स, गो. झाम्पा 24 (21 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), केन विल्यम्सन नाबाद 50 (44 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), प्रियम गर्ग झे. झाम्पा, गो. चहल 7 (14 चेंडू), जेसॉन होल्डर नाबाद 24 (20 चेंडूत 3 चौकार). अवांतर 10. एकूण 19.4 षटकात 4 बाद 132.
गडी बाद होण्याचा क्रम : 1-2 (गोस्वामी, 0.4), 2-43 (वॉर्नर, 5.4), 3-55 (मनीष पांडे, 8.3), 4-67 (प्रियम गर्ग, 11.5).
गोलंदाजी : सिराज 4-0-28-2, सैनी 3.4-0-31-0, वॉशिंग्टन सुंदर 2-0-21-0, झाम्पा 4-0-12-1, यजुवेंद्र चहल 4-0-24-1, मोईन अली 1-0-4-0, शिवम दुबे 1-0-7-0.