वृत्तसंस्था / शारजा
ख्रिस गेलच्या बहुप्रतिक्षित पुनरागमनानंतर किंग्स इलेव्हन पंजाब संघ परिपूर्ण प्रदर्शन करून विजयी घोडदौड सुरू केलेल्या कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरविरुद्ध गुरुवारी विजय मिळविण्याची अपेक्षा करीत आहे. प्लेऑफच्या शर्यतीतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी पंजाबला हा सामना जिंकणे अत्यावश्यक बनले आहे. हा सामना सायंकाळी 7.30 पासून सुरू होईल.
अष्टपैलू प्रदर्शन करण्यातील अपयश आणि जिंकण्याच्या स्थितीतील सामने गमवावे लागल्याने पंजाबला सातपैकी सहा सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. मात्र त्यांना हुरुप देणारी एकमेव गोष्ट म्हणजे, त्यांनी मिळविलेला एकमेव विजय हा आरसीबीविरुद्धच मिळविलेला आहे. 24 सप्टेब्ंारला त्यांच्यातील हा सामना झाला होता. मात्र आरसीबी संघाच्या प्रदर्शनात आता बरीच सुधारणा झाली आहे. शारजाची खेळपट्टी हळूहळू संथ होत असली तरी मैदान छोटे असल्याने गेलसारख्या बिग हिटरकडून षटकारांची आतषबाजी होण्याची शक्यता आहे. मात्र 41 वर्षीय गेलला पहिल्या चेंडूपासूनच असे करणे अवघड जाऊ शकते. कारण यावेळच्या आयपीएलमध्ये त्याने एकही सामना खेळलेला नाही. त्याचा हा पहिलाच सामना असेल. पंजाबच्या मागील दोन सामन्यात तो खेळू शकला असता. पण अन्नविषबाधा झाल्याने त्याला संघाबाहेर रहावे लागले होते. तो आता पूर्ण फिट झाला असून त्याला कोणाच्या जागी संघात स्थान दिले जाते हे पहावे लागेल. ग्लेन मॅक्सवेलकडून आतापर्यंत अपेक्षित कामगिरी झाली नसल्याने कदाचित त्यालाच संघाबाहेर ठेवले जाऊ शकते. किंवा विदेशी गोलंदाजाला बदलून त्याच्या जागी गेलला स्थान दिले जाण्याची शक्यता वाटते.
या स्पर्धेत सर्वाधिक धावा जमविणारे अव्वल दोन फलंदाज केएल राहुल (387) व मयांक अगरवाल (337) पंजाब संघात असले तरी हा संघ गुणतक्त्यात तळाच्या स्थानावर आहे.
मोहम्मद शमी व रवि बिश्नोई या दोन गोलंदाजांनी आश्वासक कामगिरी केली असली तरी अन्य गोलंदाजांना विश्वासार्ह कामगिरी करता आलेली नाही, विशेषतः डेथ ओव्हर्समध्ये. संघात योग्य समतोल येण्यासाठी त्यांनी अनेकांना आजमावून पाहिले. पण असे करताना त्यांची बरीच घसरण झाली आहे. आरसीबीला आता सूर गवसला असल्याने त्यांचा आत्मविश्वासही वाढला आहे. त्यामुळे पंजाबला त्यांना नमविण्यासाठी सरस कामगिरी करणे क्रमप्राप्त ठरणार आहे.
बऱयाच वर्षानंतर आरसीबीला गोलंदाजीतील उणिवा पहिल्यांदाच दूर करण्यात यश आले आहे.
यजुवेंद्र चहल व वॉशिंग्टन सुंदर ही फिरकी द्वयी अतिशय प्रभावी ठरली असून ख्रिस मॉरिसच्या पुनरागमनानंतर त्यांचा जलद माराही अधिक बळकट झाला आहे. आरसीबीचा केकेआरविरुद्धचा याआधीचा शेवटचा सामनाही याच मैदानावर झाला असल्याने हळूहळू बदलणाऱया येथील परिस्थितीचा त्यांना पंजाबपेक्षा जास्त अनुभव आहे. पंजाबचा येथील सामना 27 सप्टेंबरला झाला होता, त्यावेळी खेळपट्टी फलंदाजीस थोडीफार अनुकूल होती. फिंचला सूर गवसल्याने आरसीबीचे पहिले चार फलंदाज (कोहली, पडिक्कल, डीव्हिलियर्स) कोणत्याही संघासाठी दुःस्वप्न ठरू शकतात, त्यामुळे पंजाबला त्यांना रोखण्यासाठी शर्थ करावी लागणार आहे. @किंग्स इलेव्हन पंजाब : केएल राहुल (कर्णधार), हरप्रीत ब्रार, इशान पोरेल, मनदीप सिंग, नीशम, तजिंदर सिंग, जॉर्डन, करुण नायर, दीपक हुडा, बिश्नोई, अर्शदीप सिंग, मॅक्सवेल, मुजीब उर रहमान, सर्फराज खान, कॉट्रेल, अगरवाल, शमी, दर्शन नलकांडे, निकोलस पूरन, गेल, एम.अश्विन, जगदीशा सुचित, के. गौतम, व्हिलोएन. @आरसीबी : कोहली (कर्णधार), डीव्हिलियर्स, पार्थिव पटेल, फिंच, फिलिप, मॉरिस, मोईन अली, सिराज, शाहबाज अहमद, देवदत्त पडिक्कल, चहल, सैनी, स्टीन, पवन नेगी, उदाना, दुबे, उमेश यादव, गुरकीरत सिंग मान, सुंदर, पवन देशपांडे, झाम्पा.