गोवा फॉरवर्डची सरकारवर टीका
प्रतिनिधी / पणजी
आरोग्य क्षेत्रातील कोविड वॉरियर्सना 20 टक्के पगारवाढ देण्यासंबंधी वर्षभरापूर्वी केलेल्या घोषणेचा सरकारला पूर्णपणे विसर पडला आहे, अशी टीका गोवा फॉरवर्ड पक्षाच्या उपाध्यक्ष डॉ. रेणुका डिसिल्वा यांनी केली आहे.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्यावेळी जॉन नाझारेथ यांचीही उपस्थिती होती. गतवर्षी 7 एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स यासारख्या कोविड वॉरियर्सना बेसीक पगारात 20 टक्के वाढ देण्याचे आश्वासन दिले होते. त्याला नंतर मान्यताही देण्यात आली. परंतु आतापर्यंत तेही एक आश्वासनच ठरले आहे. कोविड वॉरियर्स आपले काम आजही त्याच इमाने इतबारे करत आहेत. सरकारने मात्र आपले आश्वासन पाळलेले नाही. हा प्रकार निषेधार्ह आहे, असे डॉ. डिसिल्वा म्हणाल्या. श्री. नाझारेथ यांनी बोलताना, कोरोनाच्या दुसऱया लाटेवेळी लागू करण्यात आलेल्या कर्फ्यकाळात सर्व सरकारी कार्यालयात 50 टक्के उपस्थितीत काम चालणार असा आदेश काढण्यात आला होता. प्रत्यक्षात त्याचे कुठेच पालन होत नाही. सर्व कार्यालय प्रमुख आपल्या सर्व कर्मचाऱयांना रोज उपस्थित राहण्याचे आदेश देत आहेत. अन्न व औषध प्रशासन, जलसंवर्धन, लेखा संचालनालय, पोलीस व गोमेकॉतील प्रशासकीय विभाग यातील कर्मचारी यांची 100 टक्के उपस्थिती दिसून येत आहे. यातील बहुतेक कार्यालये ही प्रशस्त नाहीत. सामाजिक अंतर राखून काम करणे त्यांना शक्य नाही. त्यामुळे कोरोना फैलाव होण्यास वाव मिळतो. त्यातून अनेक कार्यालयात कोरोनाबाधित सापडल्याची उदाहरणे आहेत. या प्रकाराविरोधात मुख्य सचिवांना निवेदन देणार असल्याचे नाझारेथ यांनी सांगितले.