धामणी येथे आज केंद्रीय रस्ते वाहतूक,जलमार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार उद्घाटन
प्रतिनिधी /बेळगाव
सांगली आणि मिरज या आरोग्य पंढरीच्या जवळील धामणी रस्त्यावर आजपासून ‘उषःकाल अभिनव’ हॉस्पिटल जनसेवेत रुजू होत आहे. शनिवार दि. 26 मार्च रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक व जलमार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या हॉस्पिटलचे उद्घाटन होत आहे.
या सोहळय़ासाठी खा. संजयकाका पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, कृषि व सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजीत कदम, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील (यड्रावकर), गृह राज्यमंत्री सतेज पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार धैर्यशील माने व कर्नाटक राज्याच्या मंत्री शशिकला जोल्ले त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील सर्व पक्षांचे नेते मंडळी, अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
एकाच छताखाली सर्व प्रकारच्या आजारांवर आधुनिक उपचाराच्या सुविधा येथे उपलब्ध आहेत. गेली सुमारे चार दशके वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले नामांकित युरॉलॉजिस्ट डॉ. मिलिंद परीख यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली हे हॉस्पिटल उभारले आहे. आज कोणत्याही आजारावरील उपचारासाठी विविध ठिकाणी चाचण्या, तपासण्या करण्याची गरज पडते. त्यासाठी रुग्णाला घेऊन त्याच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागते. मात्र एकाच छताखाली सर्व तपासण्या, उपचार आणि औषधांची सुविधा या ठिकाणी उपलब्ध असणार आहे.
तब्बल अकरा मजल्यांच्या देखण्या इमारतीमध्ये असलेल्या या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये साडेतीनशे बेड्स, शंभर आयसीयू, पंधरा सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स, पंचेचाळीस वैद्यकीय विभाग आणि 28 सुपरस्पेशालिटी विभाग आहेत. 80 तज्ञ डॉक्टर्स याठिकाणी सेवा देणार आहेत.
एकाच छताखाली अनेक सुविधा
याबरोबरच रुग्णांना एकाच छताखाली एमआरआय स्कॅन, सीटी स्कॅन, डिजिटल एक्स-रे, नवजात शिशू अतिदक्षता विभाग, लहान मुलांचा अतिदक्षता विभाग, लॅबोरेटरी, डायलिसिस या सर्व सुविधा उपलब्ध आहेत.
पोटविकारापासून हृदय व मेंदू विकारपर्यंतच्या सर्व रोगांचे अतिप्रगत उपचार येथे होणार आहेत. माता व शिशू उपचार एकाच ठिकाणी मिळणार आहेत. तर आहारतज्ञांमार्फत प्रत्येक रुग्णाला आहाराबाबत मार्गदर्शनही मिळणार आहे. अत्यावश्यक विभागातील रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्याची सुविधाही येथे आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर कर्नाटक, गोवा याबरोबरच सांगलीच्या आसपास असलेल्या शहरांतील रुग्णांना तातडीने उपचार मिळण्यासाठी आयसीयू ऍम्ब्युलन्सचीही सोय केली आहे. याशिवाय उषःकाल अभिनव हॉस्पिटलकडे तातडीने व सहजपणे पोहोचण्यासाठी रस्ते, रेल्वे आदी वाहतूक साधनांच्याद्वारे सहज शक्य होणार आहे.
आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठी उपचारात सवलतही मिळणार आहे. त्याचबरोबर सर्व प्रकारच्या आजारावरील उपचारांसाठी असलेल्या उषःकाल अभिनव सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना आरोग्य विमा योजनेची सुविधा मिळणार आहे. नामांकित कंपन्यांच्या आरोग्य विम्याची सुविधा येथे उपलब्ध असल्याने विमाधारक रुग्णांना उपचाराच्या खर्चाचा बोजा पडणार नाही.