राज्य बुलेटीन म्हणते बेळगाव शुन्य , तर जिल्हा बुलेटीन म्हणते बारा रुग्णांची भर
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना बाधितांची माहिती देण्यात आरोग्य विभागाचा घोळ सुरुच आहे. या घोळामुळे बेळगावात गोंधळात भर पडली असून राज्य व जिल्हा बुलेटीनमधील माहितीमुळे कोणावर विश्वास ठेवायचा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कोरोना बाधितांची माहिती जाहीर करताना आरोग्य विभाग काही तरी लपवून ठेवते आहे का? असा संशयही बळावत चालला आहे.
बुधवारी सायंकाळी राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटीनमध्ये बेळगावात एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही, असा उल्लेख आहे. तर गेल्या 24 तासांत सिव्हिल हॉस्पिटलमधून कोरोनामुक्त झालेल्या पाच जणांना घरी पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. याचवेळी आलेल्या जिल्हा बुटेलीनमध्ये मात्र गेल्या 24 तासांत बेळगाव शहर व तालुक्मयात 12 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचा उल्लेख आहे.
जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागातील बेबनावामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली असून या संबंधी खात्री करुन घेण्यासाठी जिल्हा सर्व्हेक्षणाधिकारी डॉ. बाळकृष्ण तुक्कार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता आपण बैठकीत असल्याचा संदेश पाठविला. प्रत्यक्षात माहिती मात्र दिलीच नाही. आरोग्य विभाग, कोरोना बाधितांच्या जीवाशी खेळ करतो की काय? असा संशय निर्माण व्हावा अशी सध्याची परिस्थिती आहे.
जिल्हा सर्व्हेक्षण विभागाने बुधवारी जारी केलेल्या बुलेटीनमधील माहितीनुसार 5 हजार 600 जणांना 14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे तर जिह्यातील 14 हजार 516 जणांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात आले आहे. 1 हजार 974 जणांनी 14 दिवसांचे तर 6 हजार 845 जणांनी 28 दिवसांचे क्वारंटाईन पूर्ण केल्याची माहिती देण्यात आली आहे.
जिह्यातील एकूण 13 हजार 220 जणांचे स्वॅब तपासणी करण्यात आली असून या पैकी 10 हजार 817 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 216 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 126 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 97 जणांवर सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत.
उपलब्ध माहितीनुसार प्रशासनाला आणखी 2 हजार स्वॅब तपासणी अहवालांची प्रतिक्षा आहे. मंगळवारी रात्रीपासून बेळगाव शहरातील कुंतीनगर (जुना पी. बी. रोड), मार्कंडेयनगर येथे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची चर्चा होती. बाधितांना 108 रुग्ण वाहिकेतून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवितानाची छायाचित्रेही सोशल मीडीयावर व्हायरल झाली होती. असे असूनही राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटीनमध्ये मात्र बेळगावातील बुधवारची रुग्ण संख्या शुन्य असा उल्लेख केला आहे.
बाधितांची संख्या 216 वर
बेळगाव जिह्यातील कोरोना बाधितांची संख्या बुधवारी 216 वर पोहोचली आहे. मंगळवारी एका दिवसात बेळगाव जिह्यातील 51 रुग्णांची भर पडली होती. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 204 वर पोहोचली होती. बुधवारी आणखी 12 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 216 वर पोहोचली आहे. जिल्हा आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटीनमध्ये या आकडेवारीचा उल्लेख आहे.