चहा कामगार नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश
गुवाहाटी / वृत्तसंस्था
आसामची विधानसभा निवडणूक जवळ आलेली असताना काँग्रेस आघाडीला मोठा धक्का बसला आहे. राज्यातील चहा कामगार संघटनेचे नेते रूपेश गवाला यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ते आसाम चहा मझदूर संघटन या संघटनेचे नेते असून या संघटनेचा मोठा प्रभाव चहा कामगारांवर असल्याचे बोलले जाते.
ही संघटना काँगेसप्रणित नॅशनल ट्रेड युनियन काँगेस या संघटनेशी संलग्न आहे. ही संघटना आता बाहेर पडल्याने अनेक मतदारसंघांमधील समीकरणे बदलू शकतात. गवाला यांना काँगेसने दुमदुमा या मतदारसंघात तिकीट नाकारल्याने ते नाराज झाले होते असे सांगितले जाते. तथापि, त्यांनी या आरोपाचा इन्कार केला आहे. तसेच काँगेसनेही ही जागा त्यांना देण्याची तयारी दर्शविली होती, असे म्हटले आहे. मात्र, आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीने आणि विचारसरणीने प्रभावित होऊन भाजपमध्ये प्रवेश करत आहोत, असे गवाला यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या प्रवेशामुळे उत्तर आसाममध्ये भाजप आणखी प्रबळ होईल अशी शक्यता आहे. केंद्रीय भाजप नेतृत्वानेही त्यांच्या प्रवेशाचे स्वागत केले.
चहा कामगारांचा प्रश्न
आसाम सरकारने नुकतीच चहा कामगारांच्या वेतनात मोठी वाढ केली. तर काँगेसने प्रतिदिन 365 रूपये वेतन देण्याचे आश्वासन दिले होते. चहा कामगारांचा प्रभाव आसामच्या 126 मतदारसंघांपैकी किमान 42 मतदारसंघांमध्ये असतो. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत याच मतदारसंघांमध्ये भाजपला मोठे यश मिळाले होते. काँगेसनेही या कामगारांकडे गेल्या दोन महिन्यांपासून लक्ष देण्यास सुरवात केली होती. मात्र गवाला यांच्या भाजप प्रवेशाने पक्षाची चिंता वाढली असल्याचे काँगेस नेते खासगीत मान्य करीत आहेत.