यजमान इंग्लिश संघ 1 डाव व 76 धावांनी विजयी, डावात 5 बळी घेणारा रॉबिन्सन सामनावीर
लीड्स / वृत्तसंस्था
जलद गोलंदाज ऑलि रॉबिन्सनने भारतीय मध्यफळीला जोरदार सुरुंग लावल्यानंतर इंग्लंडने भारताचा तिसऱया कसोटीत एक डाव व 76 धावांनी धुव्वा उडवला आणि 5 सामन्यांच्या या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. भारताने शनिवारी 2 बाद 215 या मागील धावसंख्येवरुन डावाला पुढे सुरुवात केली. पण, रॉबिन्सन (26 धावात 5 बळी) व जेम्स अँडरसन (1-26) यांच्या भेदक माऱयासमोर संघाचा डाव अक्षरशः पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळत गेला. या विजयासह इंग्लंडने लॉर्ड्सवरील पराभवाचा हिशेब येथे लीड्सवर चुकता केला.
इंग्लिश संघाने आपली रणनीती अचूकपणे अंमलात आणत विजय अक्षरशः खेचून आणला. रॉबिन्सनने डावात 5 बळी घेण्याची ही मालिकेतील दुसरी वेळ ठरली.
भारताचा पहिला डाव पहिल्या दिवशी अवघ्या 78 धावांमध्ये खुर्दा झाला आणि तेथेच संघाच्या पदरी अपयश येणार, हे देखील जवळपास निश्चित झाले. इंग्लंडने पहिल्या डावाअखेर 254 धावांची भरभक्कम आघाडी घेतल्याने पूर्ण 3 दिवस फलंदाजी करत सामना वाचवण्याचे कठीण आव्हान भारतासमोर होते. शुक्रवारी सामन्याच्या तिसऱया दिवशी जिगरबाज फलंदाजी करत यात थोडेफार यश मिळवले देखील. पण, शनिवारी पहिल्या सत्रापासूनच भारताचा डाव पुन्हा गडगडत राहिला आणि यानंतर इंग्लंडच्या एकतर्फी विजयावर शिक्कामोर्तब होणे केवळ औपचारिक होते.
शुक्रवारी भक्कम भासणारी मधली फळी शनिवारी चौथ्या दिवसाच्या खेळात मात्र पार ढेपाळली. भारताचे अनेक फलंदाज आपला ऑफ स्टम्प कुठे आहे, हे देखील विसरले असावेत, असे अनेकदा निदर्शनास आले. भारताने आपले शेवटचे 8 फलंदाज अवघ्या 63 धावांमध्येच गारद झाले. पहिल्याच सत्रात एकापाठोपाठ एक फलंदाज बाद होत राहिल्याने ऍडलेड कसोटीची आठवण ताजातवाना झाली. त्या लढतीप्रमाणेच येथेही भारतीय फलंदाज उत्तम चेंडूंवर एक तरी यष्टीरक्षकाकडे किंवा स्लीपमधील क्षेत्ररक्षकांकडे सोपे झेल देत तंबूत परतत राहिले.
चेतेश्वर पुजाराने (91) चेंडू सोडून देण्याच्या प्रयत्नात रॉबिन्सनच्या इनकटरवर आपली विकेट बहाल केली आणि इथेच पडझडीला सुरुवात झाली. जो रुटने घेतलेला रिव्हय़ू निर्णायक ठरला. कोहलीने अँडरसनला दोन चौकार फटकावत उत्तम सुरुवात केली. पण, नंतर तो रुटकडे झेल देत तंबूत परतला. या मालिकेत विराटने यष्टीरक्षकाकडे किंवा स्लीपमध्ये झेल देऊन बाद होण्याची ही पाचवी वेळ ठरली.
अजिंक्य रहाणेने (10) दोन-एक चौकार मारले असले तरी तो अँडरसनचा सावज ठरला. यष्टीमागे बटलरने त्याचा सोपा झेल टिपला. रिषभ पंत (1) पुन्हा एकदा जलद गोलंदाजाला पुढे सरसावून आक्रमक फटका मारण्याच्या प्रयत्नात विकेट बहाल करुन गेला आणि नंतर देखील ही पडझडीची मालिका कायम राहिली.
भारताची 2 बाद 215 वरुन 6 बाद 239 अशी पडझड झाली आणि रविंद्र जडेजाने (30) थोडीफार फटकेबाजी करुन नवव्या गडय़ाच्या रुपाने बाद झाल्यानंतर संघाचा पराभव ही केवळ औपचारिकता होती. सिराजला ओव्हर्टनने (3-47) बाद केले आणि भारताचा डाव 99.3 षटकात 278 धावांमध्ये गुंडाळला गेला.
पहिल्या डावात 78, दुसऱया डावात 278!
या सामन्यात भारताचा पहिला डाव 40.4 षटकात सर्वबाद 78 धावांवर खुर्दा झाला तर दुसऱया डावात संघाला 99.3 षटकात सर्वबाद 278 धावांपर्यंत मजल मारता आली. आपल्या पहिल्या डावात 432 धावांचा डोंगर रचणारा इंग्लिश संघ या लढतीत तिन्ही आघाडय़ांवर भारतापेक्षा बराच सरस ठरला. इंग्लंडची पहिल्या डावाअखेर 254 धावांची आघाडी विशेष निर्णायक ठरली.
रॉबिन्सनने उलगडला कोहलीला बाद करण्याचा ‘सिम्पल प्लॅन’
भारतीय कर्णधार विराट कोहली या मालिकेत चौथ्या व पाचव्या स्टम्पच्या रोखाने येणाऱया चेंडूंवर सातत्याने झगडत राहिला आणि याचाच लाभ घेत इंग्लिश कंपनीने आधुनिक क्रिकेटमधील या सर्वोत्तम फलंदाजावर सातत्याने दडपण राखत कमालीचे यश प्राप्त केले. सामनावीर ऑलि रॉबिन्सन हा विराटला पुन्हा बाद करता आल्याने विशेष हरखून गेला आणि त्याने कोहलीला बाद करण्याचा आपला सिम्पल प्लॅन काय होता, हे देखील उलगडले.
रॉबिन्सन याप्रसंगी आपल्या रणनीतीबद्दल बोलताना म्हणाला, ‘कोहलीला बाद करणे नेहमीच खास असते आणि शनिवारचा दिवस देखील याला अपवाद असण्याचे कारण नव्हते. एका षटकात दोनवेळा त्याने मला चौकारासाठी फटकावले आणि त्यानंतरही मी त्याला चौथ्या व पाचव्या स्टम्पच्या रोखानेच चेंडू टाकण्यावर भर दिला. अशा एका चेंडूवर विराट छेडण्याचा प्रयत्न करेल आणि यष्टीमागे, स्लीप कॉर्डनमध्ये झेल देऊन बाद होऊ शकेल, हा होरा होता. अंतिमतः आमचा हा गेमप्लॅन 100 टक्के यशस्वी झाला’!
कोट्स
पहिला डाव अवघ्या 78 धावात कोसळल्यानंतर यजमान संघ डावाअखेर मोठी आघाडी घेण्याचा प्रयत्न करणार, हे निश्चित होते. आम्ही दुसऱया डावात उत्तम सुरुवात केली. पण, नंतर सातत्य राखता आले नाही. इंग्लिश गोलंदाज आमच्यावर दडपण राखण्यात यशस्वी ठरले.
-भारतीय कर्णधार विराट कोहली
अँडरसनचे इंग्लिश भूमीत 400 बळी
जलद गोलंदाज जेम्स अँडरसनने इंग्लिश भूमीत 400 बळी घेण्याचा माईलस्टोन या लढतीत सर केला. एकाच देशात सर्वाधिक कसोटी बळी घेण्याचा विक्रम सध्या लंकन फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनच्या खात्यावर आहे. त्याने लंकेत अवघ्या 73 सामन्यात 493 बळी घेतले आहेत. अँडरसनचा लीड्सवरील सामना हा कारकिर्दीत मायभूमीतील 94 वा होता. या निकषावर त्याने सचिनच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
एकाच देशात सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज
गोलंदाज / देश / सामने / बळी
मुथय्या मुरलीधरन / श्रीलंका / 73 / 493
जेम्स अँडरसन / इंग्लंड / 94 / 400
अनिल कुंबळे / भारत / 63 / 350
स्टुअर्ट ब्रॉड / इंग्लंड / 85 / 341
शेन वॉर्न / ऑस्ट्रेलिया / 69 / 319
जो रुट ठरला यशस्वी इंग्लिश कर्णधार
27 ः जो रुटने कर्णधार या नात्याने 27 वा विजय मिळवून दिला. तो आता इंग्लंडचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला. मायकल वॉनचा 26 विजयाचा विक्रम त्याने येथे मागे टाकला.
17 ः जो रुटने घरच्या भूमीवर कर्णधार या नात्याने मिळवलेला हा 17 वा विजय आहे. या निकषावर स्ट्रॉस 19 विजयासह आघाडीवर आहे.
63 ः चौथा फलंदाज बाद झाल्यानंतर भारताला डावात फक्त 63 धावा करता आल्या. दोन्ही डावात पूर्ण फलंदाजी केली असेल, अशा सामन्यातील हा दुसरा निचांक आहे. यापूर्वी 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुणे कसोटीत भारताने चौथा फलंदाज बाद झाल्यानंतर अवघ्या 41 धावा नोंदवल्या होत्या.
2 ः विराट कोहली कर्णधार असताना भारताने डावाने पराभव पत्करण्याची ही 64 सामन्यातील दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2018 मध्ये भारताला इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स कसोटीत एक डाव व 159 धावांनी चीत व्हावे लागले होते. नाणेफेक जिंकल्यानंतरही सामना गमवावा लागण्याची ही विराटसाठी दुसरी वेळ होती. यापूर्वी 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऍडलेड येथे भारतावर अशी वेळ आली होती. त्या लढतीत भारताचा दुसरा डाव 36 धावांमध्येच खुर्दा झाला होता.
6 ः लीड्समध्ये भारताला पराभूत करण्यापूर्वी इंग्लंडला मायभूमीत खेळलेल्या मागील 6 लढतीत एकही विजय मिळवता आला नव्हता. त्यांनी गतवर्षी पाकिस्तानविरुद्ध ओल्ड ट्रफोर्ड कसोटी जिंकली. त्यानंतर त्यांना विजयाने सातत्याने हुलकावणी दिली होती. ती कसर त्यांनी लीड्स कसोटीत भरुन काढली.
धावफलक
भारत पहिला डाव ः सर्वबाद 78
इंग्लंड पहिला डाव ः सर्वबाद 432
भारत दुसरा डाव ः रोहित शर्मा पायचीत गो. रॉबिन्सन 59 (156 चेंडूत 7 चौकार, 1 षटकार), केएल राहुल झे. बेअरस्टो, गो. ओव्हर्टन 8 (54 चेंडू), चेतेश्वर पुजारा पायचीत गो. रॉबिन्सन 91 (189 चेंडूत 15 चौकार), विराट कोहली झे. रुट, गो. रॉबिन्सन 55 (125 चेंडूत 8 चौकार), अजिंक्य रहाणे झे. बटलर, गो. अँडरसन 10 (25 चेंडूत 2 चौकार), रिषभ पंत झे. ओव्हर्टन, गो. रॉबिन्सन 1 (7 चेंडू), रविंद्र जडेजा झे. बटलर, गो. ओव्हर्टन 30 (25 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार), मोहम्मद शमी त्रि. गो. अली 6 (8 चेंडूत 1 चौकार), इशांत शर्मा झे. बटलर, गो. रॉबिन्सन 2 (5 चेंडू), जसप्रित बुमराह नाबाद 1 (6 चेंडू), मोहम्मद सिराज झे. बेअरस्टो, गो. ओव्हर्टन 0 (2 चेंडू). अवांतर 15. एकूण 99.3 षटकात सर्वबाद 278.
गडी बाद होण्याचा क्रम
1-34 (केएल राहुल, 18.6), 2-116 (रोहित, 47.4), 3-215 (पुजारा, 83.3), 4-237 (विराट, 89.6), 5-239 (रहाणे, 90.6), 6-239 (पंत, 91.5), 7-254 (शमी, 94.2), 8-257 (इशांत, 95.5), 9-278 (जडेजा, 99.1), 10-278 (सिराज, 99.3).
गोलंदाजी
जेम्स अँडरसन 26-11-63-1, रॉबिन्सन 26-6-65-5, क्रेग ओव्हर्टन 18.3-6-47-3, सॅम करण 9-1-40-0, मोईन अली 14-1-40-1, जो रुट 6-1-15-0.
भारताचा दुसरा डाव गडगडताना…
गडी क्र. / फलंदाज / धावा / दिवस व वेळ / सांघिक धावसंख्या
1 / केएल राहुल / 8 / तिसरा दिवस, पहिले सत्र / सायं. 5.28 वा. / 34
2 / रोहित शर्मा / 59 / तिसरा दिवस, तिसरे सत्र / रात्री 8.39 वा. / 116
3 / पुजारा / 91 / चौथा दिवस, पहिले सत्र / दुपारी 3.46 वा. / 215
4 / विराट कोहली / 55 / चौथा दिवस, पहिले सत्र / सायं. 4.19 वा. / 237
5 / अजिंक्य रहाणे / 10 / चौथा दिवस, पहिले सत्र / सायं. 4.26 वा. / 239
6 / रिषभ पंत / 1 / चौथा दिवस, पहिले सत्र / सायं. 4.33 वा. / 239
7 / मोहम्मद शमी / 6 / चौथा दिवस, पहिले सत्र / सायं. 4.47 वा. / 254
8 / इशांत शर्मा / 2 / चौथा दिवस, पहिले सत्र / सायं. 4.55 वा. / 257
9 / रविंद्र जडेजा / 30 / चौथा दिवस, पहिले सत्र / सायं. 5.10 वा. / 278
10 / मोहम्मद सिराज / 0 / चौथा दिवस, पहिले सत्र / सायं. 5.13 वा. / 278