लंडन / वृत्तसंस्था
इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू सॅम करण पाठीच्या दुखापतीमुळे आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेतून बाहेर फेकला गेला आहे. आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपरकिंग्स संघाचे प्रतिनिधीत्व करत असताना त्याला ही दुखापत झाली. इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाने याबद्दल माहिती दिली. टी-20 वर्ल्डकपमध्ये सॅमची जागा त्याचा भाऊ टॉम करण घेईल, असेही त्यांनी नमूद केले.
येत्या दोन-एक दिवसात सॅम करण मायदेशी परतत असून तेथे ईसीबीचे वैद्यकीय पथक प्राथमिक तपासणी करेल आणि त्यानंतर उपचाराची दिशा स्पष्ट होईल. यापूर्वी शनिवारी झालेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्ध आयपीएल साखळी सामन्यादरम्यान सॅमला पाठदुखीचा त्रास जाणवला होता. 23 वर्षीय सॅमने इंग्लंडतर्फे 24 कसोटी, 11 वनडे व 16 टी-20 सामने खेळले आहेत.