पिंकी, रविंदर, रोहित यांचा प्लेऑफमध्ये पराभव
वृत्तसंस्था/ ओस्लो, नॉर्वे
भारताची अनुभवी महिला मल्ल सरिता मोरने येथे सुरू असलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्टेज चारमध्ये विद्यमान विजेत्या लिंडा मॉरिसला पराभवाचा धक्का देत उपांत्य फेरी गाठली तर अंशु मलिकनेही आपल्या गटातून शेवटच्या चारमध्ये स्थान मिळवित पदकाचे आव्हान जिवंत राखले आहे.
विद्यमान आशियाई चॅम्पियन असलेल्या सरिताला 59 किलो वजन गटाच्या पहिल्या लढतीत कॅनडाच्या माजी चॅम्पियनविरुद्ध बराच संघर्ष करावा लागला. पण अखेर सरिताने 8-2 असा टॅक्टिकल विजय मिळवित आगेकूच केली. सरिताने प्रारंभापासूनच आक्रमक खेळ करीत लिंडाला खाली घेतले आणि अप्रतिम बचाव करीत पहिल्या फेरीअखेर 7-0 अशी आघाडी घेतली. दुसऱया फेरीत लिंडाने सरिताला खाली घेत गुण मिळविला. मात्र सरिताने लिंडाला जखडून ठेवत तिच्या पद्धतीने खेळण्याची तिला संधीच दिली नाही. उपांत्यपूर्व फेरीत जर्मनीच्या सँड्रा पारुस्झेवस्कीविरुद्धची लढत मात्र सरिताला फारच जड गेली. दोघांमध्ये बराच काळ खडाखडीचाच खेळ झाल्याने त्यांची दमछाकही झाली. पण लढतीच्या अखेरच्या टप्प्यात सरिताने सँड्राला खाली घेतल्याने तिला एक गुण मिळाला आणि तो विजय मिळवून देण्यास तिला पुरेसा ठरला. तिची उपांत्य लढत बल्गेरियाची युरोपियन चॅम्पियन बिलयाना झिवकोव्हा डुओडोव्हाविरुद्ध होणार आहे.
महिलांच्या 57 किलो वजन गटात युवा अंशू मलिकने अपेक्षापूर्ती करताना शानदार विजय मिळवित उपांत्य फेरीत धडक मारली. तिने कझाकच्या निलुफर रायमोव्हाला तांत्रिक सरसतेवर सहज पराभूत केल्यानंतर मंगोलियाच्या दवाचिमेग एर्खेम्बायरचा 5-1 असा धुव्वा उडविला. 72 किलो वजन गटात भारताच्या दिव्या काकरनने क्सेनिया बुराकोव्हाला चितपट करीत धक्कादायक विजय मिळविला. मात्र उपांत्यपूर्व फेरीत तिला जपानच्या मासाको फुरुइचकडून तांत्रिक सरसतेच्या आधारे पराभव स्वीकारावा लागला. दिव्याने दोन्ही लढतीत झुंजार खेळ केला. पण उपांत्यपूर्व फेरीत घाईघाईने केलेल्या चाली आणि अतिआक्रमण करण्याचा खेळ तिला महाग पडला.
किरणने (76 किलो गट) रेपेचेज फेरीत तुर्कीच्या आयसेगुल ओझबेगेवर विजय मिळवित कांस्यपदकाच्या फेरीत पोहोचली आहे. पण पूजाला (53 किलो) रेपेचेज लढतीत इक्वेडोरच्या लुईसा एलिझाबेथ मेलेन्ड्रेसकडून पराभव स्वीकारावा लागला. याशिवाय रुतु मलिकही (68 किलो) युक्रेनच्या ऍनास्तेशिया लावरेन्चुककडून पात्रता फेरीतच केवळ 15 सेकंदात पराभूत झाली. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पहिले पदक जिंकण्याचे पिंकीचे स्वप्नही भंगले. कांस्यपदकाच्या प्लेऑफमध्ये अमेरिकेच्या जेन्ना रोज बर्कर्टकडून 2-5 अशा गुणांनी पिंकीला पराभव स्वीकारावा लागला. बर्कर्टने पिंकीला चाली करण्याची फारशी संधीच दिली नाही. पुरुषांमध्ये रविंदर (61 किलो) व रोहित (65 किलो) यांनाही कांस्यपदक प्लेऑफ लढतीत पराभव पत्करावा लागला.