पहिली कसोटी दुसरा दिवस : लॉरेन्सचे पदार्पणातच अर्धशतक
वृत्तसंस्था/ गॅले
कर्णधार जो रूटने झळकवलेले नाबाद शतक, डॅन लॉरेन्सचे पदार्पणातील अर्धशतक यामुळे इंग्लंडने पहिल्या कसोटीच्या दुसऱया दिवशी यजमान लंकेवर 185 धावांची आघाडी मिळविली आहे. दुसऱया दिवशी पावसाचा व्यत्यय आल्याने चहापानानंतर खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे शनिवारी 15 मिनिटे लवकर खेळ सुरू करण्यात येणार आहे. मात्र शनिवारीही पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
इंग्लंडने लंकेचा पहिला डाव 135 धावांत गुंडाळल्यानंतर पहिल्या दिवशीअखेर इंग्लंडने 2 बाद 127 धावा जमविल्या होत्या आणि रूट व लॉरेन्स (73) यांनी चौथ्या गडय़ासाठी नोंदवलेल्या 173 धावांच्या भागीदारीमुळे शुक्रवारी चहापानापर्यंत त्यांनी 4 बाद 320 धावांपर्यंत मजल मारली होती. दिवसअखेर रूट 168 व जोस बटलर 7 धावांवर खेळत होते. रूटने या खेळीत 12 चौकार नोंदवले आहेत. दुसऱया दिवसाचा खेळ सुरू झाल्यावर बेअरस्टो (47) दुसऱयाच षटकात बाद झाला. पण रूटने 66 या धावसंख्येवरून सुरुवात करीत 18 वे कसोटी शतक नोंदवून लंकन गोलंदाजांवर दडपण कायम ठेवले. उपाहारानंतर त्याने दिलरुवान परेराच्या गोलंदाजीवर एकेरी धाव घेत शतक पूर्ण केले. मागील वर्षात त्याला एकही कसोटी शतक नोंदवता आले नव्हते आणि आयसीसी मानांकनातही त्याची टॉप टेनमधून घसरण झाली होती. 23 वर्षीय लॉरेन्सने कर्णधाराला चांगली साथ देताना फिरकी माऱयाला आत्मविश्वासाने तोंड दिले आणि 95 चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने त्याने पदार्पणातच अर्धशतक पूर्ण केले. त्याला 60 व 68 धावांवर दोन जीवदानेही मिळाली. मेंडिसकरवी झेलबाद करून परेराने त्याची खेळी संपुष्टात आणली.
तत्पूर्वी, डावखुरा स्पिनर लसिथ एम्बुल्डेनियाने बेअरस्टोला बाद करीत तिसरा बळी मिळविला. 2 बाद 17 अशा स्थितीनंतर बेअरस्टोने रूटसमवेत तिसऱया गडय़ासाठी 114 धावांची भागीदारी करून इंग्लंडचा डाव सावरला होता. गुरुवारी ऑफस्पिनर डॉम बेसने 30 धावांत 5 बळी मिळवित कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवत लंकेचा डाव 135 धावांत संपुष्टात आणला होता. ब्रॉडने 3 बळी मिळवित त्याला चांगली साथ दिली होती. गेल्या मार्चमध्ये कोरोना महामारीमुळे या दोन संघांतील अर्धवट राहिलेली मालिका आता पूर्ण करण्यात येत आहे.
संक्षिप्त धावफलक ः लंका प.डाव 46.1 षटकांत सर्व बाद 135 ः चंडिमल 28, मॅथ्यूज 27, शनाका 23, बेस 5-30, ब्रॉड 3-20), इंग्लंड प.डाव 94 षटकांत 4 बाद 320 ः क्रॉली 9, सिबली 4, बेअरस्टो 47 (93 चेंडूत 2 चौकार), जो रूट खेळत आहे 168 (254 चेंडूत 12 चौकार), डॅन लॉरेन्स 73 (150 चेंडूत 6 चौकार, 1 षटकार), बटलर खेळत आहे 7, अवांतर 12. गोलंदाजी ः एम्बुल्डेनिया 3-131, दिलरुवान परेरा 1-82, असिता फर्नांडो 0-21, डिसिल्वा 0-63, शनाका 0-16.