इंग्लंडला 273 धावांचे आव्हान, दुसऱया डावात चहापानापर्यंत 2 बाद 56 धावा
वृत्तसंस्था/ लॉर्ड्स
येथे सुरू असलेली इंग्लंड व न्यूझीलंड यांच्यातील पहिली कसोटी अनिर्णीत अवस्थेकडे झुकली असून 273 धावांचे आव्हान मिळाल्यानंतर चहापानापर्यंत इंग्लंडने दुसऱया डावात 32 षटकांत 2 बाद 56 धावा जमविल्या होत्या.
न्यूझीलंडने पहिल्या डावात 378 धावा जमविल्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव 275 धावांत गुंडाळून न्यूझीलंडने 103 धावांची आघाडी मिळविली. त्यानंतर न्यूझीलंडने दुसरा डाव 6 बाद 169 धावांवर घोषित करून इंग्लंडला विजयासाठी 75 षटकांत 273 धावा करण्याचे आव्हान दिले. या सामन्याच्या दुसऱया दिवशी पावसामुळे होऊ शकल नव्हता. इंग्लंडच्या पहिल्या डावात रॉरी बर्न्सने शानदार शतक झळकवले आणि जो रूट व ओली रॉबिन्सन यांनी प्रत्येकी 42 धावा जमविल्या असल्या तरीही त्यांचा डाव 101.1 षटकांत 275 धावांत आटोपला. न्यूझीलंडच्या टीम साऊदीने भेदक मारा करीत 43 धावांत 6 बळी मिळविले तर काईल जेमीसनने 85 धावांत 3 व नील वॅग्नरने 83 धावांत 1 बळी मिळविला.
न्यूझीलंडने दुसऱया डावात जलद धावा करण्याच्या हेतून आक्रमक फलंदाजीवर भर दिला होता. लॅथम व कॉनवे यांनी 39 धावांची सलामी दिली पण त्यांना मोठय़ा खेळी करता आल्या नाहीत. लॅथमला 36, कॉनवेला 23, वॅग्नरला 10, रॉस टेलरला 35 चेंडूत 33, हेन्री निकोल्सला 36 चेंडूत 23, वॅटलिंगला नाबाद 15 धावा जमविता आल्या. अवांतराच्या रूपात त्यांना 19 धावा मिळाल्या. पाचव्या व अखेरच्या दिवशी 2 बाद 62 या धावसंख्येवरून सुरुवात केल्यावर 52.3 षटकानंतर कर्णधार विल्यम्सनने उपाहाराच्या वेळी 6 बाद 169 धावांवर डाव घोषित करून इंग्लंडला 273 धावांचे आव्हान दिले. पावसाचा व्यत्यय आल्याने उपाहाराचा ब्रेक लवकर घेण्यात आला होता. या सत्रात त्यांनी 97 धावांची भर घातली होती. इंग्लंडच्या ओली रॉबिन्सनने या डावातही प्रभावी मारा करीत 26 धावांत 3 बळी मिळविले. ब्रॉड, वूड व रूट यांनी एकेक बळी मिळविला.
75 षटकांत 273 धावांचे आव्हान मिळाले असले तरी इंग्लंडने सावध खेळ करण्यावर भर दिला. त्यावरून सामना अनिर्णीत ठेवण्याचाच त्यांचा इरादा असल्याचे स्पष्ट होत होते. चहापानापर्यंत त्यांनी 32 षटकांत 2 बाद 56 धावांपर्यंत मजल मारली होती. पहिल्या डावातील शतकवीर बर्न्स 25 धावा काढून बाद झाला तर क्रॉली 2 धावांवर बाद झाला. चहापानास खेळ थांबला तेव्हा डोम सिबली 19 व रूट 0 धावावर खेळत होते. साऊदी व वॅग्नर यांनी एकेक बळी मिळविला होता.
संक्षिप्त धावफलक ः न्यूझीलंड प.डाव 378, इंग्लंड प.डाव 101.1 षटकांत सर्व बाद 275 (बर्न्स 132, रूट व रॉबिन्सन प्रत्येकी 42, पोप 22, टिम साऊदी 6-43, जेमीसन 3-85, वॅग्नर 1-83), न्यूझीलंड दु.डाव 52.3 षटकांत 6 बाद 169 डाव घोषित (लॅथम 36, कॉनवे 23, टेलर 33, निकोल्स 23, वॅटलिंग नाबाद 15, वॅग्नर 10, अवांतर 19, रॉबिन्सन 3-26, ब्रॉड 1-34, रूट 1-16), इंग्लंड दु.डाव 32 षटकांत 2 बाद 56 (बर्न्स 25, सिबली खेळत आहे 19, क्रॉली 2, अवांतर 10, साऊदी 1-21, वॅग्नर 1-5).