लंडन / वृत्तसंस्था
इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱया दिवशी पावसाचा व्यत्यय आला आणि यामुळे बराच वेळ खेळ होऊ शकला नाही. लॉर्ड्सवरील या लढतीत न्यूझीलंडने सर्वबाद 378 धावा जमवल्यानंतर इंग्लंडने दुसऱया दिवसअखेर 2 बाद 111 धावांपर्यंत मजल मारली. मात्र, शुक्रवारी सकाळपासूनच संततधार सुरु झाली आणि यामुळे खेळ सुरु होणे शक्य नव्हते. लॉर्ड्सची ड्रेनेज सिस्टीम उत्तम आहे. मात्र, यासाठी पावसाने विश्रांती घेणे आवश्यक होते. संततधार कायम राहिल्याने चहापानापर्यंतच्या सत्रात एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नव्हता.