भारत, अमेरिकेत मात्र ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणात प्राधान्य : इंडोनेशियाचा समूह प्रतिकारकक्षमता निर्मितीचा प्रयत्न
जगभरातील सुमारे 16 देशांमध्ये कोरोनाच्या विरोधात लसीकरण सुरू झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या दिशानिर्देशानुसार प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. यानुसार अमेरिका, ब्रिटनसह अनेक देशांमध्ये आरोग्य कर्मचारी आणि प्रंटलाइन कर्मचाऱयांसह वृद्धांना सर्वप्रथम लस दिली जात आहे. भारतही याच दृष्टीकोनासह पावले टाकत आहे.
इंडोनेशियातही चालू महिन्यात लसीकरण सुरू होणार असले तरीही तेथे वेगळाच प्रकार घडणार आहे. इंडोनेशियाने वृद्धांऐवजी कार्यरत लोकसंख्येला प्राथमिकता देण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य आणि सरकारी कर्मचाऱयांसह कार्यगटातील लोकसंख्येला लस देण्यात येईल. याचा उद्देश कोरोनाविरोधात वेगाने समूह प्रतिकारकशक्ती प्राप्त करून अर्थव्यवस्थेला रुळावर आणणे हा आहे. हा दृष्टीकोन अन्य देशांपेक्षा वेगळा असल्याने यावर लसतज्ञ तसेच अर्थशास्त्रज्ञांची नजर आहे.
इंडोनेशियाची रणनीति
इंडोनेशियाच्या रणनीतिमुळे समूह संसर्ग कमी करण्यास मदत मिळू शकते. याचा अर्थ त्याची रणनीति उत्तम आहे असा होत नाही. वृद्धांना गंभीर रोग होण्याचा आणि मृत्यू होण्याचा धोका अधिक असतो. याचमुळे त्यांना प्राधान्यगटात ठेवून सर्वप्रथम लस देण्यात येत असल्याचे उद्गार सिंगापूरमधील तज्ञ डेल फिशर यांनी काढले आहेत.
समूह प्रतिकारकशक्तीवर भर
सामाजिक आणि आर्थिकदृष्टय़ा सक्रीय लोकांना सर्वप्रथम लस दिल्याने लवकरात लवकर समूह प्रतिकारकक्षमता प्राप्त होणार असे इंडोनेशियाच्या सरकारचे मानणे आहे. देशाला समूह प्रतिकारकक्षमता प्राप्त करण्यासाठी 18.15 कोटी लोक म्हणजेच सुमारे 67 टक्के लोकांचे लसीकरण करावे लागेल. याकरता लसीचे 42.7 कोटी डोस लागतील. याचमुळे तरुणांना लसीकरणात सामील केले जात असल्याचे आरोग्यमंत्री बुदी गुनादी सादिकिन यांनी म्हटले आहे.
आर्थिक कारण
कोरोना महामारीने दक्षिणपूर्व आशियातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या इंडोनेशियाला मोठा झटका दिला आहे. 2 दशकांपेक्षा अधिक काळानंतर इंडोनेशियाने मोठी मंदी अनुभवली आहे. अर्थव्यवस्थेत 2.2 टक्क्यांची घसरण झाल्याचा सरकारचा अनुमान आहे. अशा स्थितीत 10 कोटी लोकांना लस मिळाल्याने अर्थव्यवस्थेला ‘जम्पस्टार्ट’ मिळणार असल्याचे अर्थतज्ञांना वाटत आहे. यातून खर्च वाढण्यासह निर्मितीसारख्या कार्यांमध्येही सुधारणा होऊन अर्थव्यवस्थांना लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.
18-59 वयोगटाला प्राधान्य
इंडोनेशियात चीनच्या सिनोवॅक बायोटेक कंपनीची लस देण्यात येणार आहे. ही लस वृद्धांवर कितपत प्रभावी आहे याचा विदा उपलब्ध नसल्याचे इंडोनेशियाचे म्हणणे आहे. लसीची चाचणी 18-59 वयोगटातील लोकांवर झाल्याने त्यांनाच प्राधान्यगटात ठेवण्यात आले आहे. इंडोनेशियाच्या औषध नियामकाने वृद्धांसाठी लसीकरण योजनेसंबंधी कुठलीच शिफारस केलेली नाही. ब्रिटन आणि अमेरिकेने फायजरच्या लसीसह लसीकरण सुरू केले आहे. ब्रिटनमध्ये आता ऑक्सफोर्डच्या कोविशिल्ड तर अमेरिकेत मॉडर्नाच्या लसीला सामील करण्यात आले आहे. या तिन्ही लसी सर्व वयोगटावर प्रभावी ठरल्य ा आहेत. इंंडोनेशियाने सिनोवॅकच्या लसीचे 12.55 कोटी डोस खरेदी करण्याचा करार केला आहे. 30 लाख डोस इंडोनेशियात पोहोचले आहेत.