मनगटाची दुखापत चिघळली, रोहित शर्मा सलामीला खेळण्याची शक्यता
सिडनी / वृत्तसंस्था
भारतीय फलंदाज केएल राहुल मनगटाच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध उर्वरित 2 कसोटी सामन्यात खेळू शकणार नसल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. मेलबर्नमध्ये सराव करत असताना त्याला ही दुखापत झाली होती. केएल राहुलला या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात संधी मिळाली नव्हती.
‘केएल राहुलला एमसीजीवर सराव सत्रात फलंदाजी करत असताना डाव्या मनगटाची दुखापत झाली. शनिवारी ही घटना घडली. त्यानंतर दुखापत चिघळल्याने तो उर्वरित मालिकेत खेळणार नाही’, असे बीसीसीआयने जाहीर केले. या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला किमान तीन आठवडय़ांचा कालावधी लागेल, असेही मंडळाने यात स्पष्ट केले.
सराव सत्रात थ्रो डाऊन स्पेशालिस्ट राहुलला फलंदाजीचा सराव देत होते. वेदना जाणवल्याने राहुलला त्यावेळी सराव तेथेच थांबवावा लागला. नियमित कर्णधार विराट कोहली खेळणार नसल्याने त्याला संधी मिळण्याची अपेक्षा होती. ही मालिका सुरु होण्यापूर्वी स्वतः विराटनेच राहुलला मध्यफळीत खेळवण्याचा विचार बोलून दाखवला होता. मात्र, मनगटाची दुखापत उद्भवल्याने केएल राहुलसाठी उरल्यासुरल्या आशाअपेक्षा संपुष्टात आल्या आहेत.
केएल राहुल सिडनीला संघासमवेत पोहोचला. पण, येथे आल्यानंतर तो खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आणि मंगळवारी उशिरा तो भारताकडे रवानाही झाला. पुढील वैद्यकीय उपचारासाठी तो बेंगळुरातील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडे रवाना होईल. दरम्यान, या दुखापतीमुळे तो इंग्लंडविरुद्ध आगामी कसोटी मालिकेत तरी खेळणार का, याबद्दलही साशंकता निर्माण झाली आहे. इंग्लंडविरुद्ध 4 कसोटी सामन्यांची मालिका दि. 5 फेब्रुवारीपासून खेळवली जाणार आहे.
केएल राहुल मायदेशी रवाना झाल्यानंतर आता अंतिम संघात मयांक अगरवाल व हनुमा विहारी यांच्यापैकी एकाचे स्थान अबाधित राहील, हे निश्चित आहे. उपकर्णधार रोहित शर्मा कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करणार, यावर हा निर्णय बेतलेला असेल. सध्या मयांक व विहारी हे दोघेही खराब फॉर्ममध्ये असून या दोघांना 8 डावात केवळ एकच अर्धशतक झळकवता आले आहे. रोहित सलामीला उतरत असेल तर अगरवालला संधी मिळणार नाही, हे निश्चित आहे. रोहित व शुभमन सलामीला आणि अगरवालला मध्यफळीत हा आणखी एक पर्याय असेल. याशिवाय, रोहित मध्यफळीत आणि सलामीला अगरवाल व गिल हा तिसरा पर्याय असणार आहे.
डेव्हिड वॉर्नर खेळण्याची शक्यता, पुकोवस्कीचे पदार्पण जवळपास निश्चित
सिडनी : ऑस्ट्रेलियन फलंदाजी लाईनअपमधील मुख्य योद्धा मानल्या जाणाऱया डेव्हिड वॉर्नरचे तिसऱया कसोटी सामन्यात खेळणे जवळपास निश्चित असल्याचे संकेत ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी दिले आहेत. या क्रिकेट प्रकारात वॉर्नरला फारसा सराव करता आला नसला तरी ती चिंतेची बाब नाही, असे लँगर यांचे मत आहे. युवा फलंदाज पुकोवस्की गुरुवारी कसोटी पदार्पण करेल, असेही ते याप्रसंगी म्हणाले.
वॉर्नर व पुकोवस्की हे दोघेही दुखापतीमुळे या मालिकेत अद्याप खेळू शकलेले नाहीत. पुकोवस्की तर ऍडलेडमध्ये मालिकेतील पहिल्या लढतीतच कसोटी पदार्पण करेल, असे संकेत होते. पण, कन्कशनमुळे त्याला पदार्पणासाठी प्रतीक्षा करावी लागेल, हे स्पष्ट झाले होते. वॉर्नरही धोंडशिरेच्या दुखापतीने त्रस्त असल्याने या कसोटी मालिकेत अद्याप खेळू शकलेला नाही.
‘वॉर्नरला कसोटी क्रिकेट खेळणे विशेष पसंत असते. मंगळवारी सराव सत्रात त्याने जोरदार सराव केला आणि तो पूर्ण बहरातही दिसून आला. वॉर्नरने तंदुरुस्ती चाचणी पार केली असून तो स्वतः येथे खेळण्यासाठी महत्त्वाकांक्षी आहे’, असे लँगर यांनी पुढे स्पष्ट केले. मागील वर्षभराच्या कालावधीत वॉर्नरने एकही चार दिवसीय सामना खेळलेला नाही. पण, अनुभव हे त्याचे बलस्थान आहे आणि अनुभवाच्या बळावरच तो यशस्वी होईल, असा विश्वास लँगर यांनी येथे व्यक्त केला. वॉर्नरमधील उर्जा टिकवून ठेवण्यासाठी त्याला स्लीपमध्ये तैनात केले जाईल. अर्थात, याची सवय नसल्याने तो थोडासा बेचैन असू शकतो, असे लँगर यांचे मत आहे. स्वतः वॉर्नरने शनिवारी आपण तिसऱया लढतीसाठी पूर्ण तंदुरुस्त असू का, याबद्दल साशंकता व्यक्त केली होती व यामुळे अनेक तर्कवितर्क उमटणे साहजिक होते. मात्र, आता स्वतः लँगर यांनीच वॉर्नरचे खेळणे जवळपास निश्चित असल्याचे स्पष्ट केल्याने या चर्चेला तूर्तास अल्पविराम मिळाला आहे.
उभय संघातील ही 4 कसोटी सामन्यांची मालिका सध्या 1-1 ने बरोबरीत आहे. ऍडलेडमधील पहिली लढत यजमान ऑस्ट्रेलियाने जिंकली तर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने मेलबर्नमधील दुसरी कसोटी जिंकत जोरदार मुसंडी मारली.
शार्दुल ठाकुर की नवदीप सैनी? अद्याप अनिश्चितता
सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्ध उद्यापासून (दि. 7) खेळवल्या जाणाऱया तिसऱया कसोटी सामन्यात मयांक अगरवालऐवजी रोहित शर्मा सलामीला खेळण्याची शक्यता आहे. मात्र, तिसरा मध्यमगती गोलंदाज म्हणून शार्दुल ठाकुरला खेळवणार की नवदीप सैनीला, हे अद्याप निश्चित झालेले नाही.
मयांक अगरवाल आपल्या शेवटच्या 8 कसोटी डावात तब्बल 7 वेळा अपयशी ठरला आहे. त्यामुळे, त्याला संघातील स्थान गमवावे लागेल, हे जवळपास निश्चित मानले जाते. मात्र, दुखापतग्रस्त उमेश यादवऐवजी शार्दुलला खेळवायचे की नवदीपला हे अद्याप कोडे आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबईचा सीमर व तळाच्या क्रमवारीत उत्तम फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱया शार्दुलला फेवरीट मानले जात होते. पण, काही वरिष्ठ खेळाडूंनी नवदीप सैनीला संधी देण्याची सूचना केली असल्याचे वृत्त आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाजीला लगाम घालण्यासाठी सैनीचा अचूक मारा उपयुक्त ठरेल, असा या खेळाडूंचा होरा आहे.
मंगळवारी सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर भारतीय संघाने सराव केला आणि अर्थातच रोहित शर्मावर सर्वांचे लक्ष केंद्रित होते. रोहितने फिरकी व जलद-मध्यम गोलंदाजीवर सहजपणे फटकेबाजी केली. एससीजीची मुख्य खेळपट्टी ढगाळ वातावरणामुळे आच्छादित ठेवली गेली असून याचमुळे भारताने तिसरा सीमर कोण असावा, याचा निर्णय घेतलेला नाही, असाही होरा आहे. सध्याच्या घडीला पाटा विकेट असेल तर जुन्या चेंडूवर उत्तम रिव्हर्स स्विंग करु शकणाऱया सैनीला आणि दव असेल तर त्यावर उपयुक्त ठरणाऱया शार्दुल ठाकुरला संधी मिळेल, असे संकेत आहेत.
टी. नटराजनबद्दलही उत्सुकता
यॉर्कर स्पेशालिस्ट टी. नटराजन उपलब्ध असल्याने तिसरा सीमर कोण, यात आणखी स्पर्धा निर्माण झाली आहे. नटराजनने आतापर्यंत 20 प्रथमश्रेणी सामने खेळले आहेत. मात्र, या क्रिकेट प्रकारात त्याने शेवटचा सामना जानेवारीत खेळला आहे.
भारताचा अपेक्षित संघ (फलंदाजी क्रमाने 12 खेळाडू) : रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (कर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, जसप्रित बुमराह, शार्दुल ठाकुर/नवदीप सैनी.