पेट्रोल-डिझेल 15 दिवसांमध्ये 9 रुपयांपेक्षा अधिक महाग
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे मालवाहतूकदार आणि व्यापाऱयांपासून सर्वसामान्य लोक सर्वजण प्रभावित होऊ लागले आहेत. इंधन दरवाढीचा थेट प्रभाव आता बाजारपेठेवर होतोय. मागील 15 दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेल प्रतिलिटर 9 रुपये 16 पैशांनी महागले आहे. याचा थेट प्रभाव मालवाहतुकीवर पडणार असून याचा खर्च 16 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
मालवाहतुकीचा खर्च वाढल्यास सर्वसामान्यांचा खिसा अधिकच रिकामी होणार आहे. भारतात डिझेलचा सर्वाधिक वापर वाहतूक आणि कृषीक्षेत्रात होतो. दर वाढल्याने ही दोन्ही क्षेत्रे सर्वाधिक प्रभावित होतात. डिझेल महागल्याने शेतीपासून पिक बाजारपेठेपर्यंत आणणे देखील महागले आहे. यामुळे सर्वसामान्य लोक आणि शेतकरी दोघांचेही बजेट बिघडणार आहे.
सर्वसामान्यांवर थेट प्रभाव
मालवाहतुकीचा खर्च 16 टक्क्यांनी वाढल्यास संबंधित वस्तूचे दरही वाहतुकीच्या खर्चाच्या हिशेबाने वाढणार आहे. वाढीव खर्च सर्वसामान्य नागरिकांकडूनच वसूल केला जाणार आहे. इंधनाचे दर वाढल्याने प्रवासाचा खर्चही वाढणार आहे. प्रवासी गाडय़ांचे भाडे वाढू शकते.
आंतरराष्ट्रीय कारणांमुळे होतेय इंधन दरवाढ
पेट्रोल-डिझेलच्या दररोज वाढणाऱया किमतींवरून केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी देशात इंधन दरवाढीमागे प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय कारणे असल्याचे म्हटले आहे. देशात इंधनाचे दर 5 टक्क्यांपर्यंत वाढले असल्याचे विधान त्यांनी केले आहे. मागील 15 दिवसांमध्ये 13 वेळा देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. पेट्रोल आणि डिझेलमध्ये या कालावधीत 9.20 रुपयांची दरवाढ झाली आहे.
भारतात इंधनाच्या किमतींमधील वाढ अन्य देशांच्या दरवाढीच्या तुलनेत खूपच कमी आहे. एप्रिल 2021 पासून 22 मार्चपर्यंत गॅसोलिनच्या (पेट्रोल) किमतीमध्ये अमेरिकेत 51 टक्के, कॅनडात 52 टक्के, जर्मनीत 55 टक्के, ब्रिटनमध्ये 55 टक्के, फ्रान्समध्ये 50 टक्के, स्पेनमध्ये 58 टक्क्यांची वाढ झाली आहे. परंतु याच्या तुलनेत भारतात 5 टक्क्यांची दरवाढ झाल्याचे पेट्रोलियम मंत्र्यांनी लोकसभेतील चर्चेदरम्यान म्हटले आहे.