इचलकरंजीमधील डब्बल मोक्यातंर्गत कारवाई केलेली तिसरी गँग
राजेंद्र होळकर / इचलकरंजी
इचलकरंजी येथील कुख्यात गुन्हेगार विक्या उर्फ विकास खंडेलवाल आणि पिस्तुल तस्कर मनीष नागोरी याच्या विक्या- मन्या गँगवर डब्बल महाराष्ट्र संघटीत गुन्हेगार कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. या गँगचे दोघे म्होरके आणि त्याचे साथिदार कळंबा कारागृहाची हवा खात असतानाही कारागृहातून मोबाईलवरून खंडणीसाठी व्यापाऱ्याना धमकावित होते. डब्बल मोक्यातंर्गत कारवाई केलेली इचलकरंजीमधील तिसरी गँग आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.
विक्या- मन्या या गँगचे म्होरके विक्या उर्फ विकास खंडेलवाल आणि मनीष नागोरी हे दोघे कारागृहातून आपल्या गँगची सुत्रे हालवित होते. त्याचा विश्वासू साथिदार व पोलीस रेकॉर्ड वरील गुन्हेगार भिष्म्या उर्फ भीमा सुभेदार चव्हाण ( रा. राजणी, ता. कवठेमंहाकाळ, जि. सांगली ) हा अन्य साथिदाराच्या मदतीने कारागृहाबाहेरील सुत्रे हालवित होता. गेल्याच आठवड्यात गुन्हेगार भिष्म्या उर्फ भीमा चव्हाण याला इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी शोध घेवून जत मधून मुसक्या आवळल्या आहेत.
पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाअधीक्षक बाबूराव महामुनी यांनी या गँगविरोधी डब्बल मोक्याचा प्रस्ताव तयार करून, त्याला नुकतीच मंजूरी मिळविली आहे. एक वर्षापासून शहरातील गँगविरोधी मोकातंर्गत थांबलेली कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानी पुन्हा एकदा सुरु पोलीस रेकॉर्डवरील अवैध धंदेवाले आणि रेकॉर्डवरील नामचिन गुंडाचे चांगलेच धाबे दणाणले आहे.