छोटय़ा पडद्यावरील हिंदी मालिका पवित्र रिश्ता खूप लोकप्रिय ठरली होती. 1 जून 2009 साली पहिला भाग प्रदर्शित झालेली ही मालिका 2014 सालापर्यंत प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहिली. आजही या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत सुशांत सिंग राजपूत, अंकिता लोखंडे, सविता प्रभुणे, प्रिया मराठे, उषा नाडकर्णी, किशोर महाबोले, प्रार्थना बेहेरे हे कलाकार होते. आता या मालिकेचा सीक्वेल येणार असल्याचे समजते आहे. या मालिकेत अर्चनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे सीक्वेलमध्ये पहायला मिळणार आहे.
मानवच्या भूमिकेसाठी अभिनेत्याचा शोध सुरू आहे. याच मालिकेने सुशांतला लोकप्रियता मिळाली होती. त्याच्यासाठी बॉलिवूडचे दरवाजे खुले झाले. नायिका अर्चनाच्या भूमिकेतील अंकिता लोखंडे सोबत सुशांतचे प्रेमही याच मालिकेच्या सेटवर जुळले. या मालिकेच्या सीक्वेलबाबत सुशांतशी बोलणं झालं होतं आणि त्याने पुन्हा एकदा मानव साकारण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं होतं. पण दुर्देवाने सुशांतने गेल्यावर्षी आत्महत्या केली. त्यामुळे या मालिकेच्या पार्ट टू साठी मानवचा शोध सुरु आहे. पवित्र रिश्ताच्या सीक्वेलमध्ये उषा नाडकर्णी दिसणार नाहीत. त्यामागचे कारणही तसेच आहे. उषा नाडकर्णी यांनी आपल्या वयाची सत्तरी ओलांडली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांनी ही मालिका करत नसल्याचे सांगितले आहे. उषा नाडकर्णी या डायबिटीज पेशंट आहेत त्यामुळे आरोग्याच्या कारणास्तव त्यांनी ही मालिकाच करत नसल्याचे जाहीर केले आहे. शिवाय त्यांच्या कुटुंबीयांनी देखील सध्याच्या कठीण काळात त्यांना काम करण्यास मनाई केली आहे. संकलन
– अनुराधा कदम