प्रतिनिधी / इचलकरंजी
शिवभोजन थाळी घेऊन पायी निघालेल्या वृद्धाला शाळेच्या बसने जोराची धड़क दिली. या धडकेनंतर बसचे चाक वृद्धाच्या उजव्या हाता, पायावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. मारुती सवाईराम ( रा.भाग्यश्री कॉलनी इचलकरंजी ) असे त्यांचे नाव आहे. हा अपघात शहरातील महात्मा गांधीजीच्या पुतळ्यानजीक सोमवारी दुपारी घडला आहे. पोलिसांनी अपघातग्रस्त बसच्या चालकाला ताब्यात घेतले आहे.
जखमी मारूती सवाईराम हे सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शहरातील मोठे तळे परिसरात असलेल्या शिवभोजन केंद्रावर थाळी आणण्यासाठी पायी आले होते. थाळी घेऊन ते घरी परतत असताना शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या महात्मा गांधी पुतळ्याजवळ भरधाव शाळेच्या बसने त्यांना पाठीमागून जोराची धड़क दिली. या धडकेनंतर अपघातग्रस्त बसचे चाक त्यांच्या उजवा हात आणि पायावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेवून बसला अडवून चालकाला ताब्यात घेवून, जखमीस आयजीएम रुग्णालयात उपचारा करीता दाखल केले. पण जखमीची प्रकृती गंभीर बनल्याने त्याला पुढील उपचाराकरीता कोल्हापूरातील सिपीआर रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबत गावभाग पोलिसात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.