प्रतिनिधी / इचलकरंजी
येथील ७० वर्षीय वृद्धाचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरवासीयांचे धाबे दणाणले आहे. आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील १५ कोरोना बाधित रुग्णामध्ये इचलकरंजीतील ३ जणांचा समावेश आहे. यामधील कोले मळा येथील कोरोनाबधित वृद्धाचे काही दिवसांपूर्वी निधन झाले आहे.
या संशयित वृद्धाला शनिवार २ मे रोजी मध्यरात्री येथील आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी पहाटे त्याचा स्वॅब घेऊन त्याला सीपीआरमध्ये पाठवण्यात आले. या वृध्दाच्या स्वॅब बरोबरच एकूण ३ जणांच्या स्वॅबचा अहवाल येणे बाकी होता. त्यापैकी सोमवार ४ मे रोजी सकाळी प्राप्त झालेल्या एका अहवालामध्ये या वृद्धाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या कोरोनाबधित रुग्णाला दमा व हृदयाचा त्रास पुर्वीपासूनच होता. अशी माहिती पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांनी दिली आहे. नदिवेस नाका परिसरातील या वृद्धाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरवासियांचे धाबे दणाणले आहेत. प्रशासनाने या वृध्दाच्या कुटुंबातील सर्वाचे स्वॅब घेऊन त्यांना कॉरंटाईन करण्याच्या हालचाली गतिमान केल्या आहेत.
दरम्यान, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी नदिवेस नाका परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. तसेच हा परिसर पूर्णपणे सील करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.