सीसीटीव्ही फुटेजवरून धक्कादायक माहिती उघड
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शहर व उपनगरात इनोव्हासह वेगवेगळय़ा कार चोरणारी हायटेक टोळी कार्यरत आहे. यासंबंधी शुक्रवारी ‘तरुण भारत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. या टोळीतील गुन्हेगार कार चोरण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करतात, अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
गेल्या आठवडय़ात शिवबसवनगर व रामतीर्थनगर येथे दोन नव्या इनोव्हा चोरल्या गेल्या आहेत. घरासमोर उभ्या करण्यात आलेल्या या इनोव्हा चोरण्यासाठी चोरटय़ांनी हातोडा, स्क्रू ड्रायव्हर किंवा बनावट चाव्या यांचा वापर केला नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून इनोव्हाचे दरवाजे उघडण्याची कला या गुन्हेगारांना अवगत आहे.
यामागे आंतरराज्य टोळीतील गुन्हेगार सक्रिय आहेत. माळमारुती पोलिसांना चोरी प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले आहेत. इनोव्हा क्रिस्टा कारला बाजारपेठेत सध्या मागणी आहे. कार चोरीसाठी या टोळीतील गुन्हेगार दुसऱया कारमधून येतात व सॉफ्टवेअरचा वापर करून इनोव्हा क्रिस्टाचा दरवाजा उघडतात. तंत्रज्ञानाचा वापर करून ते कार सुरूही करतात, असे उघडकीस आले आहे.
घटनास्थळी उपलब्ध झालेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी गुन्हेगारांचा शोध सुरू केला आहे. नव्या कोऱया इनोव्हा क्रिस्टा चोरण्याच्या घटना वाढल्या आहेत. केवळ बेळगावच नव्हे तर कर्नाटकातील इतर शहरातही इनोव्हा चोरीच्या घटना वाढल्या आहेत. यामागे आंतरराज्य गुन्हेगारी टोळी सक्रिय असल्याची माहिती उपलब्ध झाली असून माळमारुतीचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर पुढील तपास करीत आहेत.
अपघाती कार विक्रीचा आधार
चोरलेल्या इनोव्हा क्रिस्टा कारच्या विक्रीसाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, अशी माहिती उघडकीस आली आहे. किमती कार चोरणाऱया टोळय़ा चोरीच्या कार कशा विकायच्या? यात तरबेज असतात. एखाद्या अपघातग्रस्त कारचा चेस्सी क्रमांक चोरीच्या कारवर ‘पंच’ करून रितसर तिची विक्री केली जाते. अशा पद्धतीने चोरीच्या कार विकणारी मोठी टोळी कार्यरत असून बेळगावसह कर्नाटकातील वेगवेगळय़ा शहरात या टोळीने सध्या हैदोस घातला आहे.