प्रतिनिधी/ बेळगाव
एका खासगी इस्पितळाच्या इमारतीवरुन उडी टाकून एका युवकाने आपले जीवन संपविले आहे. शनिवारी सकाळी 11.55 वाजण्याच्या सुमारास किल्ला तलावाजवळील एका इस्पितळात ही घटना घडली असून माळमारुती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
परशराम भरमा मोदगे (वय 42, रा. आश्रय कॉलनी, रुक्मिणीनगर) असे त्याचे नाव आहे. तो इस्पितळाच्या लॉंड्री विभागात काम करत होता. शनिवारी सकाळी नेहमी प्रमाणे लॉंड्री विभागाचे काम सुरू होते. त्यावेळी इमारतीच्या चवथ्या मजल्यावरुन उडी टाकून परशरामने आपले जीवन संपविले आहे. या घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक सुनील पाटील व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. या घटनेचे निश्चित कारण समजू शकले नाही. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. माळमारुती पोलीस पुढील तपास करीत आहेत.