ऑनलाईन टीम / तेहरान :
इराणचे प्रमुख अणुशास्त्रज्ञ मोहसिन फखरीजादेह यांची तेहरानला लागून असणाऱ्या अबसार्ड शहरामध्ये दहशतवाद्यांनी हत्या केली. इराणच्या संरक्षण मंत्रालयाने यासंदर्भात निवेदन प्रसिद्ध केले आहे.
संरक्षण विभागाच्या माहितीनुसार, फखरीजादेह इराणचे सर्वात महत्त्वाचे अणु शास्त्रज्ञ आणि IRGCचे ज्येष्ठ अधिकारी होते. शुक्रवारी त्यांना घेऊन जाणाऱ्या कारला सशस्त्र दहशतवाद्यांनी लक्ष्य केले. त्यावेळी फखरीजादेह यांचे अंगरक्षक आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. त्यात जखमी झालेल्या फखरीजादेह यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
या हल्ल्यामागे इस्त्रायलचा हात असल्याचे संकेत मिळत आहेत. इराण आपल्या वैज्ञानिकाच्या हत्येचा बदला नक्की घेईल, असे इराणी लष्कराच्या इस्लामिक रेव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने म्हटले आहे.