अहमदाबाद / वृत्तसंस्था
गुजरातमधील बहुचर्चित इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणात अहमदाबाद येथील विशेष सीबीआय न्यायालयाने बुधवारी महत्त्वाचा निर्णय दिला. बनावट चकमक प्रकरणातील संशयित आरोपी असलेल्या तीन पोलीस अधिकाऱयांची सीबीआय न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
2004 मध्ये गुजरातमध्ये घडलेले इशरत जहाँ चकमक प्रकरण देशभरात बरेच गाजले होते. या प्रकरणी आयपीएस अधिकारी जी. एल. सिंघल यांच्यासह सेवानिवृत्त अधिकारी तरुण बारोट व अनाजु चौधरी तीन पोलीस अधिकाऱयांवर आरोप करण्यात आले होते. आता न्यायालयाने त्यांना निर्दोष असल्याचे जाहीर केले आहे. काही दिवसांपूर्वीच तिघांविरुद्धही खटला भरण्याची परवागी गुजरात सरकारने नाकारली असल्याची माहिती केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) एका न्यायालयाला दिली होती. यापूर्वी 2019 साली राज्य सरकारने अशाच प्रकारे परवानगी नाकारल्यामुळे विशेष सीबीआय न्यायालयाने माजी प्रभारी पोलीस अधिकारी डी. जी. वंजारा आणि एन. के. अमीन यांच्याविरुद्धची कारवाई रद्द केली होती. तर 2018 मध्ये माजी प्रभारी पोलीस महासंचालक पी. पी. पांडे यांनाही या खटल्यातून मुक्त करण्यात आले होते.