ऑनलाईन टीम / मुंबई :
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या 11.35 कोटींच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणली आहे. एनएसईएल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ही कारवाई करण्यात आली असून, ईडीने सरनाईक यांचे ठाण्यातील दोन फ्लॅट आणि भूखंड ताब्यात घेतला आहे. दरम्यान, या घटनेवर भाष्य करताना भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे. ईडीने आज सरनाईक यांची मालमत्ता जप्त केली. उद्या कधीतरी ईडी त्यांनाही अटक करेल, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.
मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना सोमय्या म्हणाले, एनएसईएल 5600 कोटी रुपयांचा घोटाळा असून, यामध्ये 1300 गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. आतापर्यंत या प्रकरणात 25 जणांवर कारवाई झाली होती. त्यामध्ये 3254 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. आज सरनाईक यांचा नंबर लागला. या प्रकरणात सरनाईक आणि त्यांच्या भागीदाराने 216 कोटी रुपयांचा अपहार केला होता. त्यामधील 25 कोटी रुपये सरनाईक यांच्या खात्यात जमा झाले होते. पैशातून प्रताप सरनाईक यांनी टिटवाळा येथे भूखंड खरेदी केला. या भूखंडासह दोन फ्लॅटस वर आज ईडीने कारवाई केली. हे प्रकरण इथेच थांबणार नाही. सोमय्या ही लढाई थांबू देणार नाही. आज मालमत्ता जप्त झालीय उद्या किंवा पुढे कधीतरी सरनाईक यांनाही अटक होईल, असे सोमय्या यांनी म्हटले.