वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लंडमध्ये आयोजित केलेल्या पहिल्या ‘द हंड्रेड’ क्रिकेट स्पर्धेसाठी क्रिकेटपटूंबरोबर करण्यात आलेला करार इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) रद्द केला आहे. कोरोना महामारीमुळे सदर स्पर्धा पुढील वर्षांपर्यंत लांबणीवर टाकण्यात आल्याने क्रिकेटपटूंबरोबरचा करार त्यांनी रद्द केला आहे.
इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच ‘द हंड्रेड’ ही नवी क्रिकेट स्पर्धा घेण्याचे ठरविले होते. सदर स्पर्धेत सहभागी होणारा प्रत्येक संघ 100 चेंडू खेळण्याची तरतूद करण्यात आली आहे. ही स्पर्धा पुरूष आणि महिला अशा दोन गटामध्ये 17 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यान घेतली जाणार होती. या स्पर्धेत आठ संघांना प्रवेश देण्यात आला होता पण कोव्हिड-19 च्या संकटामुळे सदर स्पर्धा एक वर्षांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. पुरूष गटात आठ संघांच्या फ्रांचायजीनी आपले खेळाडू यापूर्वी निवडले होते. इंग्लंडमधील सर्व क्रीडास्पर्धा 1 जुलैपर्यंत तहकूब करण्यात आल्या आहेत.