वृत्तसंस्था/ झाग्रेब
कोरोना महामारीमुळे क्रोएशियात लॉकडाऊनचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता पण कोव्हिड-19 च्या प्रसाराचा वेग नियंत्रणाखाली असल्याने क्रोएशियाच्या शासनाने लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर क्रोएशियाचे ऑलिंपिक विजेते व्हॅलेंट आणि मार्टिन सिनकोव्हिक यांनी आपल्या आऊटडोअर स्कल प्रशिक्षण सरावाला प्रारंभ केला आहे.
मार्च महिन्यात क्रोएशियामध्ये कोरोना महामारीच्या संकटामुळे लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला होता. क्रोएशियातील कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमध्ये खूपच सुधारणा दिसून आल्याने लॉकडाऊनचा नियम शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला. 2016 च्या रिओ ऑलिंपिक स्पर्धेत पुरूषांच्या दुहेरी स्कल्स नौकानयन प्रकारात सुवर्णपदक मिळविणारे क्रोएशियाच्या सिनकोव्हिक बंधूंनी आपल्या आऊटडोअर प्रशिक्षण सरावाला प्रारंभ केला आहे. नौकानयन क्रीडाप्रकाराच्या सरावासाठी सिनकोव्हिक बंधूंनी येथील सरोवरात सराव केला. टोकियो ऑलिंपिक स्पर्धा एक वर्षांसाठी लांबणीवर टाकण्यात आली असून आता ती स्पर्धा 23 जुलै ते 8 ऑगस्ट 2021 साली होणार आहे. टोकियो ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळविणे हे आमचे प्रमुख ध्येय असल्याचे सिनकोव्हिक बंधूंनी म्हटले आहे.