क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
आयएसएल फुटबॉल स्पर्धेत रविवारी बाद फेरी गाठण्याच्या जमशेदपूर एफसीच्या आशांना मोठा धक्का बसला. फातोर्डा येथील नेहरु स्टेडियमवर खेळविलेल्या सामन्यात एससी ईस्ट बंगालने जमशेदपूर एफसीला 2-1 गोलानी पराभूत केले.
मध्यफळीतील ईस्ट बंगालचा जर्मनीचा खेळाडू मॅट्टी स्टेनमनने सहाव्याच मिनिटाला गोल केला. दुसऱया सत्रात मध्यफळीतील त्यांचा इंग्लंडचा खेळाडू अँथनी पिल्कींग्टनने यात भर घातली. जमशेदपूर एफसीने सामना संपण्यास सात मिनिटे शिल्लक असताना गोल करून पिछाडी कमी केली. बचावफळीतील इंग्लंडचा पीटर हार्टलीने हा गोल केला. त्यानंतर मात्र जमशेदपूर एफसीला बरोबरी साधता आली नाही.
एससी ईस्ट बंगालला या विजयाने तीन गुण प्राप्त झाले. त्यांनी आपल्या 16व्या सामन्यांत तिसराच विजय मिळविला. सात बरोबरी आणि सहा पराभव अशा कामगिरीने त्यांचे 16 गुण झाले. केरळ ब्लास्टर्सला मागे टाकून त्यांनी नववे स्थान प्राप्त केले. जमशेदपूर एफसीला सोळाव्या सामन्यांत सहावा पराभव स्वीकारावा लागला असून चार विजय व सहा बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे 18 गुण आणि सातवे स्थान कायम राहिले.
खाते उघडण्याची शर्यत ईस्ट बंगालने प्रारंभीच जिंकली. पाचव्या मिनिटाला बचावपटू नारायण दास याने मध्यक्षेत्रातून चेंडूवर ताबा मिळवून डावीकडून आगेकूच करीत गोलक्षेत्रात प्रवेश केला. अँथनीला पास देण्याच्या प्रयत्न केला, मात्र जमशेदपूरचा बचावपटू स्टीफन इझेने चेंडू कॉर्नरसाठी बाहेर टाकला. नारायण दासनेच घेतलेल्या कॉर्नवर मॅट्टी स्टेनमनने शानदार हेडींग केले व टी. पी. रेहेनेशला भेदले आणि पहिल्या गोलची नोंद केली.
दुसऱया सत्रात 68व्या मिनिटाला एससी ईस्ट बगालने आपला दुसरा गोल करून आघाडी वाढविली. मॅट्टी स्टेनमनने उजव्या बगलेतून पुरविलेल्या पासवर अँथनी पिल्कींग्टनने जमशेदपूरचा गोलरक्षक रेहेनेशला चकविले व दुसरा गोल केला. सामना संपण्यास सात मिनिटे शिल्लक असताना जमशेदपूरने आपली पिछाडी एक गोलने कमी केली. बदली मध्यरक्षक एतोर मॉनरॉयने घेतलेल्या कॉर्नरवर स्ट्रायकर नेरीयूस वाल्सकीसने हेडींग केल्यानंतर चेंडू गोलक्षेत्राच्या डावीकडे गेला. त्यावर बदली मीडफिल्डर इसाक वनमाल्साव्माने केलेल्या क्रॉसवर एका जबरदस्त हेडेंगवर पीटर हार्टलीने ईस्ट बंगालचा गोलरक्षक सुब्रोतो पॉलला गोल अडविण्याची कोणतीही संधी दिली नाही.