महसूल विभागाच्या बैठकीत मनपा आयुक्तांच्या सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील मालमत्तांची नोंद ऑनलाईन करण्यासाठी ई-अस्ती प्रणालीचा वापर केला जात आहे. या प्रणालीवर सर्व मालमत्तांची नोंद करण्याचे उद्दिष्ट महसूल निरीक्षकांना देण्यात आले होते. मात्र हे काम संथगतीने सुरू असल्याने महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच ई-अस्ती नोंदणीचे काम करण्यास प्राधान्य देऊन पूर्ण करा, प्रलंबित राहिल्यास निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महसूल निरीक्षकांना आयुक्तांनी दिला.
महापालिकेच्या महसूल विभागाची बैठक सोमवारी दुपारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी बैठकीत महापालिका आयुक्तांनी ई-अस्ती नोंदीची माहिती जाणून घेतली. ई-अस्ती नोंदीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास महसूल निरीक्षकांना अपयश आले आहे. त्यामुळे कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच ई-अस्ती नोंदी करताना नागरिकांकडे विविध कागदपत्रांची विचारणा करण्यात येत असल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. नागरिकांना ई-अस्तीबाबतची व्यवस्थित माहिती देऊन नोंद करण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी सूचना द्या. ज्या मालमत्ताधारकांनी कागदपत्रांची पूर्तता केली आहे, अशा मालमत्तांची नोंद ई-अस्ती प्रणालीवर तात्काळ करा, अशी सूचना आयुक्त रुदेश घाळी यांनी केली.
ई-अस्ती नोंदीचे काम करण्यास प्राधान्य द्यावे. प्रत्येक वॉर्डामध्ये मालमत्तांची नोंद करणे बंधनकारक आहे. दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण न केल्यास निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा आयुक्तांनी महसूल निरीक्षकांना दिला. यावेळी महापालिकेच्या 58 वॉर्डांचे महसूल निरीक्षक तसेच अधिकारी उपस्थित होते.
…मात्र आयुक्तांनी कोणतीच चर्चा केली नाही!
ई-अस्ती प्रणालीवर मालमत्तांची नोंद करण्यात महसूल उपायुक्त अडथळा निर्माण करीत असल्याची तक्रार महापालिका कर्मचारी संघटनेने आयुक्तांकडे केली होती. याबाबत कोणती कारवाई होणार याकडे कर्मचाऱयांचे लक्ष लागले होते. मात्र याबाबत आयुक्तांनी कोणतीच चर्चा केली नाही. तसेच महसूल उपायुक्त कोरोनाबाधित असल्याने रजेवर असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.