मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ऑनलाईनला ग्राहकांची पसंती : रेडसीर कंसल्टिंगची माहिती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ऍमेझॉन, वॉलमार्टसह फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील यासारख्या ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपन्यांनी चालू सणासुदीच्या दिवसांमध्ये पहिल्या 3 ते 4 दिवसात तब्बल 3.1 अब्ज डॉलर्सच्या (22,000 कोटी रुपये) साहित्याची विक्री केल्याची माहिती रेडसीर कंसल्टिंगने दिली आहे.
15 ते 19 ऑक्टोबरच्या कालावधीत ऑनलाईन फेस्टिव्हल सीझनची सुरुवात ही समाधानकारक झाली आहे. चालू वर्षातील फेस्टिव्हल सेल हा मागील वर्षाच्या फेस्टिव्हल सेलच्या तुलनेत तेजीत सुरु असल्याचे दिसून येत आहे.
शहर आणि लहान गावांमधील विक्रेत्यांना जादाची ऑर्डर प्राप्त होत आहेत, असे ऍमेझॉन इंडियाने म्हटले आहे. मागील वर्षातील फेस्टिव्हल सीझनमध्ये ई कॉमर्स प्लॅटफॉर्मने 3.8 अब्ज डॉलर्सच्या साहित्याची विक्री केली होती.
ऑनलाईन फेस्टिव्ह सेल
फ्लिपकार्टने बिग बिलियन डेज सेलचा प्रारंभ 16 ऑक्टोबरपासून झाला. मिंत्रा बिग फॅशन फेस्टिव्ह सेल 16 ते 22 ऑक्टोबरमध्ये आणि ऍमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्ह सेल 17 ऑक्टोबरला सुरु झाला. सदर सेलला ग्राहकांनी मोठी पसंती दर्शवली आहे.
80 टक्के स्थानिक ब्रँड
स्नॅपडीलने म्हटले आहे, की 80 टक्के विक्रीचे ब्रँड हे स्थानिक राहिले आहेत. मागील उत्सवी दिवसात हा आकडा 65 आणि 35 टक्क्यांवर सरासरी राहिला होता. चालू वर्षात 70 टक्के ऑर्डर पहिल्या 5 महानगरांच्या बाहेरील शहरांमधून मिळाली असल्याचीही माहिती सांगितली.