फास्टॅगद्वारे प्रतिदिन 80 कोटींहून अधिक महसूल प्राप्त : दिवसात 50 लाखांहून अधिक व्यवहार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
फास्टॅगद्वारे इलेक्ट्रॉनिक टोल (ई-टोल) संकलनाने नवा विक्रम प्रस्थापित केल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) दिली आहे. एनएचएआयनुसार 24 डिसेंबर रोजी ई-टोलद्वारे प्राप्त रकमेचा आकडा 80 कोटी प्रतिदिनाच्या पलिकडे पोहोचला आहे. प्रतिदिन देशभरातील सर्व टोलनाक्यांवर आता 50 लाखांहून अधिक व्यवहार होत आहेत. देशात आतापर्यंत 2.20 कोटीहून अधिक फास्टॅग जारी करण्यात आले आहेत.
1 जानेवारी 2021 पासून सर्व वाहनांसाठी (दुचाकी वगळून) फास्टॅग अनिवार्य केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व टोलनाक्यांवर वाहनांची ये-जा सुलभपणे व्हावी यादृष्टीने व्यवस्था केली जात आहे. फास्टॅग वापरात आणल्याने टोलनाक्यावर वाहनचालकांचा वेळ आणि इंधन वाचणार आहे. केंद्रीय मोटर व्हीकल नियमात अलिकडेच झालेल्या बदलानंतर डिजिटल व्यवहारांना चालना मिळाल्याचे एनएचएआयचे म्हणणे आहे.
फास्टॅग खरेदीची सुविधा
एनएचएआयनुसार सद्यकाळात देशात सुमारे 30 हजार पॉइंट ऑफ सेल (पीओएस) आणि सर्व टोलनाक्यांवर फास्टॅग सहजपणे उपलब्ध आहेत. वाहनचालक या ठिकाणांवरून फास्टॅग खरेदी करू शकतात. याचबरोबर अमेझघ्Ÿन, फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील यासारख्या ई-कॉमर्स व्यासपीठांवरूनही फास्टॅगची ऑनलाईन खरेदी केली जाऊ शकते. एनएचएआयने फास्टॅग कार्यक्रमासाठी 27 बँकांसोबत भागीदारी केली आहे. फास्टॅग भारत बिल पेमेंट सिस्टीम, युपीआय, पेटीएमसह माय फास्टॅग मोबाईल ऍपद्वारे सहजपणे रिचार्ज करता येतो.
रिचार्ज सुविधा
वाहनचालकांची सुलभता पाहता टोलनाक्यांवर फास्टॅग रोख रकमेद्वारेही रिचार्ज करविता येणार असल्याचे एनएचएआयने म्हटले आहे. फास्टॅग रेडिओ-फ्रीक्वेंसी आयडेंटिफेशन (आरएफआयडी) तंत्रज्ञानावर काम करतो, वाहनचालकांना कुठल्याही थांब्याशिवाय टोलनाका पार करण्याची सुविधा त्याच्यामुळे प्राप्त होते. या प्रक्रियेदरम्यान टोलनाक्यावर फास्टॅगशी संलग्न बँक वॉलेटमधून रकम अदा होते.