वार्ताहर/ उचगाव
उचगाव येथील रेणुकादेवी मंदिराचा उद्घाटन सोहळा शुक्रवार दि. 20 रोजी आयोजित केला असून दुपारी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. उद्घाटन समारंभाला अलौकिक मठाचे मठाधीश शिवानंद गुरुजी उपस्थित राहणार आहेत.
मंगळवारी सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत गावातील सर्व देवदेवतांच्या मंदिरामध्ये ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला. बुधवारी सकाळी शिवाजी महाराज चौकामधून रेणुकादेवीच्या मूर्तीची व कलशाची भव्य मिरवणूक ढोल, ताशांच्या गजरात डोकीवर कलश घेऊन भंडाऱयाची उधळण करत काढली. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन मल्लाप्पा पावशे यांनी केले. गणेशमूर्तीचे पूजन उत्तम कोवाडकर, रेणुका देवी मूर्तीचे पूजन चंद्रकांत कदम पाटील व संध्या कदम पाटील यांनी केले. कळस पूजन उमेश चोपडे व जयश्री चोपडे यांनी केले.
मिरवणूक कचेरी गल्ली, सुरवीर गल्ली, आंबेडकरनगर, सुरवीर गल्ली, मारुती गल्ली, लक्ष्मी गल्ली, गणपत गल्ली या प्रमुख मार्गावर काढली. रात्री ओढय़ाची रेणुका या मंदिराच्या ताईबाई गल्ली रेणुका भक्तमंडळ कोल्हापूर यांचे रेणुकादेवीची महिमा व जीवनचरित्र सांगणारे कलापथकाने कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाचे उद्घाटन बाळकृष्ण तेरसे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष संभाजी कदम होते. कार्यक्रमाला लॅण्ड ट्रिब्युनलचे माजी संचालक बाळासाहेब देसाई, माजी ग्रा. पं. अध्यक्ष अंजना जाधव, दिनकर पावशे, ब्रह्मानंद पावशे, यल्लाप्पा हुंदरे, एल. डी. चौगुले उपस्थित होते.
गुरुवारी वास्तूशांती, होमहवन व शेळीन होसूरचे भाऊसाहेब पाटील यांचे प्रवचन व कीर्तन कार्यक्रम पार पडला. शुक्रवारी सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी सकाळी मूर्तीप्रतिष्ठापणा, कळसारोहण व पडली तसेच ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. सूत्रसंचालन व आभार एन. ओ. चौगुले, पुंडलिक पावशे यांनी केले.