ऑनलाईन टीम / जोशीमठ :
उत्तराखंडातील जोशीमठ मधून जरुरी साहित्य घेऊन ओलीला जात असलेल्या सैन्याचे वाहन चिखलात रुतल्याने नियंत्रण सुटून जवळपास 20 मीटर खोल दरीत जाऊन कोसळले. या घटनेत दोन जवान जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळापासून जवळच साहसी खेळांचे प्रशिक्षण घेत असलेल्या भारतीय पर्वतारोहण संस्थानच्या गिर्यारोहकांनी तात्काळ बचावकार्य सुरू करून जखमी जवानांना सैन्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ही घटना सोमवारी रात्री 12 नंतर घडली. रस्ता खचल्यामुळे हा अपघात झाला असे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, जखमी जवानांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार होत आहेत. घटनास्थळी वेळेवर पोलिस देखील दाखल झाले आणि त्यांनी पुढील तपास सुरू केला आहे.