ऑनलाईन टीम / प्योंगयांग :
उत्तर कोरियाने लांब पल्ल्याचे ‘इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक’ हे क्षेपणास्त्र तयार केले आहे. हे क्षेपणास्त्र अमेरिकेतील कोणत्याही शहराला लक्ष्य करू शकते.
वर्कर्स पार्टीच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांग येथे भव्य लष्करी परेड आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी या क्षेपणास्त्राचे सादरीकरण करण्यात आले. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यावेळी उपस्थित होते.
उत्तर कोरियाचे हे क्षेपणास्त्र जगातील सर्वात मोठे रोड मोबाईल क्षेपणास्त्र असू शकते. ते अमेरिकेच्या कोणत्याही शहरावर हल्ला करू शकते. एका संकेतस्थळाच्या वृत्तानुसार, उत्तर कोरियाच्या नवीन क्षेपणास्त्र परेडची माहिती मिळाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संतप्त झाले आहेत. मात्र, त्यांनी अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.