प्रतिनिधी/ पणजी
कोरोना काळात उत्तर गोव्यात विशेषतः म्हापशात बेकायदेशीररित्या इमारती बांधण्याचे काम होत आहे. तसेच समुद्रकिनाऱयावर, शेतजमीनीत इमारती बांधल्या जात आहेत. ही बेकायदेशीर कृत्यांना परवानगी देण्यासाठी सरकारी अधिकारी लाच घेत आहेत. उत्तर गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरण काहीच कारवाई करत नाही. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बर्डे यांनी उत्तर गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरण मळा पणजी येथे सदस्य सचिवांना निवेदन दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना केला.
सध्याच्या कोरोना काळात राज्यात बेकायदेशीर कामे मोठय़ा प्रमाणात सुरू आहेत. परंतु या कामांना प्राधिकरण बेकायदेशीररित्या परवाना देत आहे. बिल्डर लॉबीसाठी सामान्य माणसांच्या जमिनी घेत आहेत असा आरोप बर्डे यांनी केला आहे. म्हापशात सनस्टार होम्स हे बेकायदेशीर बांधकाम करत आहेत. सदर बांधकाम पाच मजल्याचे असून सहा मजली इमारत बांधण्याचे काम करत आहेत. या बेकायदेशीर कामाला प्राधिकरणाने परवानगी दिली आहे. अशा बेकायदेशीर कामांना जर प्राधिकरण परवाना द्यायला लागले तर प्राधिकरणाची काय गरज असा प्रश्न बर्डे यांनी उपस्थित केला आहे.