विशेष प्रतिनिधी/ पर्वरी
सरकार उत्तर गोव्यात एक आणि दक्षिण गोव्यात एक अशी दोन जिल्हा पंचायत भवने येत्या 5 वर्षात बांधणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. झेडपी भवन उभारण्यासाठी योग्य ती जागा दोन्ही जिल्हय़ांमध्ये शोधून काढण्याचे निर्देश पंचायत संचालनालयास दिल्याचेही त्यांनी सांगितले.
काल सोमवारी पर्वरी सचिवालयात जिल्हा पंचायतींच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथविधी सोहळ्य़ानंतर त्यांना मार्गदर्शन करताना डॉ. सावंत बोलत होते. राजकारण बाजूला ठेवून विकासाची कामे करा. सरकारच्या सर्व योजना घराघरात पोहोचवा आणि त्याचा लाभ त्यांना करुन द्या. चांगल्या कामाची पोचपावती लोकच देतील, असा सल्लाही डॉ. सावंत यांनी दिला. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते. यावेळी पंचयातमंत्री माविन गुदिन्हो, पंचायत संचालक नारायण गाड उपस्थित होते.
जिल्हा पंचायतीचे अधिकार वाढविणार
निवडून आलेल्या जिल्हा पंचायत सदस्यांनी पक्षपातळीवर राजकारण न करता सर्व जनतेच्या समस्या सोडविल्या पाहिजेत. सरकारचा तुम्हाला पूर्ण पाठींबा मिळणार आहे. जिल्हा पंचायतीसाठी आम्ही निधी वाढविला आहे. आता लवकरच जिल्हा पंचायतीसाठी काही अधिकार वाढवून दिले जाणार आहेत. या अधिकारांचा वापर करुन सामान्य जनतेचा विकास केला पाहिजे. आपल्याला अधिकर नाही असे कुणीही समजू नये. जनतेने तुम्हाला निवडून दिले आहे, त्यामुळे या जनतेसाठी तुम्ही काम केले पाहिजे, यात कधीच आपला स्वार्थ पाहू नये, असे मुख्यमंत्री म्हणाले.
जि. पं. सदस्यांना मिळणार खास प्रशिक्षण
जिल्हा पंचायत सदस्यांना विकासावर भर देण्यासाठी तसेच कशा प्रकारे जनतेची सेवा करावी यासाठी खास प्रशिक्षण कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार आहे. एका संस्थेमार्फत हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तळागाळातील लोकांपर्यत सरकारी योजना तुम्ही पोहचविल्या पाहिजेत. त्यांच्या समस्या सरकारच्या नजरेस आणून त्या सोडविण्याचा प्रयत्न करावा, यासाठी खास प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचवा
पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत संकल्पानुसार गोवा सरकार ‘स्वयंपूर्ण गोवा’ या अंतर्गत अनेक योजना राबिवत आहे. आतापर्यंत 35 योजना आम्ही या मार्फत राबविल्य आहेत. शेतकरी, दुग्ध व्यवसायिक व मासे पालन करणाऱयांना शेतकऱयांचा दर्जा देऊन त्यांना सुमारे 1.5 लाख पर्यत विनाव्याज कर्ज दिले जात आहे. तसेच मनरेगा अंतर्गत कामे वाढविण्यात आली आहेत. या योजना जिल्हा पंचायत सदस्यांनी सामान्य जनतेपर्यंत पोहोचवाव्यात, असे मुख्यमंत्री म्हणाले.
जिल्हा पंचायतीला सरकारचा पूर्ण पाठिंबाः गुदिन्हो
जिल्हा पंचायत सदस्यांनी चांगले काम करुन मोठय़ा पदापर्यंत पोचावे. सरकार तुम्हाला आणखी अधिकार वाढवून देणार आहे. जिल्हा पंचायतीसाठी निधी 35 कोटीवरुन आता 75 कोटी करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही तळागाळातील लोकांची कामे करण्यावर भर द्यावा. सरकार तसेच पंचायत खात्यातर्फे सर्वतोपरी मदत तुम्हाला मिळणार आहे, असे पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा पंचायत निवडणुकीत निवडून ओलेल्या उत्तर गोवा व दक्षिण गोव्याच्या सर्व 49 सदस्यांना शपथ देऊन प्रमाणपत्र देण्यात आले.
चारही पदे बिनविरोध निवडून आणण्यासाठी भाजपचे प्रयत्न
दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीमध्ये अध्यक्षपद, तर उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे उपाध्यक्षपद ही दोन्ही पदे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. पंचायत सचिव संजय गिहार यांनी यासंदर्भात अधिसूचना जारी आली. दोन्ही जिल्हा पंचायतीवर दोन्ही पदे काबीज करण्यासाठी आता भाजप उमेदवारांमध्ये मोर्चेबांधणी सुरु झाली असून विरोधक भुईसपाट झाल्यामुळे वरील एकूण चारही पदे बिनविरोध निवडून काढण्याचे प्रयत्न भाजपने सुरु केले आहेत.