प्रतिनिधी/ मडगाव
आपण उत्तर प्रदेशचा मंत्री असल्याचे भासवून राज्य सरकारचा शाही पाहुणचार घेणारा आणि प्रशासनाच्या नाकाला काळे फासण्याचा प्रयत्न करणाऱया उत्तर प्रदेशातील एका तोतया मंत्र्याला गोव्याच्या गुप्त पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. या तोतया मंत्र्याबरोबर आणखी तिघेजण आहेत.
डॉ. सुनिल सिंग असे या तोतया डॉक्टमरचे नाव असून या डॉक्टरची रात्री उशिरापर्यंत गुप्तचर विभागात सखोल चौकशी चालू होती. तोतया मंत्री डॉ. सुनिल सिंग व त्याच्याबरोबर आणखी तिघे मिळून चारजणांचा हा ताफा आहे.
गेल्या काही दिवसापूर्वी हे चौघेजण गोव्याच्या दौऱयावर आले होते. उत्तर प्रदेशातून गोव्यात येताना त्यांनी बनावट ओळखपत्र तयार केले होते. मंत्री म्हणून भासवणाऱया डॉ. सुनिल सिंग याने मंत्रीपदाचे नाटक व्यवस्थित वटविले होते. गोव्याच्या काही मंत्र्यांबरोबर गेले काही दिवस उत्तर प्रदेशातील या तोतया मंत्र्याने उठबस केली होती.
‘अतिथी देवो भव’ च्या भावनेने वागणाऱया गोवेकरांकडून या चौकडीने पुरेपूर फायदा उठविला होता. आणि त्याहुनही पुढचा भाग म्हणजे या तोतया मंत्र्याने एक पत्रकार परिषदही घेतली होती आणि गोवा आणि उत्तर प्रदेश यांचे वाणिज्य संबंध दृढ करण्याचा निर्धार व्यक्त केला होता.
मात्र, गोव्याच्या गुप्तचर पोलिसांमुळे या तोतया मंत्र्याचे बिंग अखेर फुटले. उत्तर प्रदेशातून गोव्याला येत असताना अंदाजे चार राज्ये लागतात. या चार राज्यातून प्रवास करताना या तोतया मंत्र्याने बनावट ओळखपत्र तयार केले होते. या बनावट ओळखपत्रामुळे या तोतया मंत्र्याला वाटेत कोणीही अडविण्याचे धाडस केले नाही.
‘अतिथी देवो भव’ प्रमाणे आदरतिथ्य करीत असताना प्रसंगी व्यक्ती किंवा प्रशासन किती कठोर होऊ शकते याचा प्रत्यय यावेळी आला. उत्तर प्रदेशातील या तोतया मंत्र्याला दिलेले पोलीस संरक्षण जेव्हा या तोतया मंत्र्यांने नाकारले आणि रंगेल वृत्ती दाखविण्याचा प्रयत्न केला तेव्हाच गुप्तचर संस्थेला संशय आला.
नंतर काही घटना अशा पद्धतीने घडल्या की हा संशय बळावला आणि उत्तर प्रदेशातील हा मंत्री संभाव्य संशयित आरोपी या नजरेने गुप्तचर पोलीस पाहून लागले. आणि यासंबंधी पुसटशी खात्री होताच या तोतया मंत्र्याला ताब्यात घेण्यात आले.
सदर मंत्री आणि त्याच्याबरोबर असलेल्या इतर तिघांना गुन्हा अन्वेषण विभागाच्या मुख्यालयात नेण्यात आले. तेथे बराच वेळ उपअधीक्षकांच्या कार्यालयात त्यांची चौकशी करण्यात आली.
उत्तर प्रदेश मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्र्यांचा आकडा 25 आहे. या कॅबिनेट मंत्र्यात डॉक्टर ही उपाधी असलेले दोन मंत्री आहेत. उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा आणि जलशक्ती मंत्री डॉ. महेंद्रसिंग.
स्वतंत्र ताबा असलेले 9 राज्य मंत्री उत्तर प्रदेश प्रदेशात आहेत. त्यात डॉक्टर ही उपाधी असलेला एकच मंत्री आहे आणि त्यांचे नाव डॉ. गिरीराज सिंग धर्मेश. (समाज कल्याण, अनुसुचित जाती व आदिवासी कल्याण खाते.) मात्र, डॉ. सुनिल सिंग याचे नाव या यादीत कोठेच झळकत नाही.
ताब्यात घेतलेल्या या चारही जणांची सध्या गुप्तचर पोलिसांमार्फत सखोल चौकशी चालू आहे.
गेल्या काही वर्षापूर्वी उत्तर प्रदेशच्या काही संशयित आरोपींनी बेताळभाटी येथे सामुहीक बलात्कार केला होता. सध्या उत्तर दतेशातील अनेक आरोपी गोव्याच्या तुरुंगात ख्तिपत पडलेले आहेत. तोतया मंत्र्याने शाही पाहुणचार घेणे हा त्यातल्या त्यात गुन्ह्याचा एक नवा प्रकार होय.