ऑनलाईन टीम / लखनऊ :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. हा वाढता प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सोमवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनऊ मधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जावून कोरोनाचा पाहिला डोस घेतला.
लस टोचून घेतल्यानंतर योगी आदित्यनाथ म्हणाले की, कोरोनाची लस सर्वांना निःशुल्क उपलब्ध आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे आभार मानतो. तसेच देशातील सर्व शास्त्रज्ञांना देखील धन्यवाद देतो. ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे. आपली वेळ आली की सर्वांनी लस घ्यावी तसेच लस घेतल्यावर सर्वांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी जनतेला केले आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशात रविवारी रेकॉर्ड ब्रेक रुग्ण म्हणजेच 4,164 नवे रुग्ण आढळून आले. तर 31 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला. यापूर्वी 27 सप्टेंबर 2020 रोजी 4 हजार पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले होते. सद्य स्थितीत प्रदेशात 19,738 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आता पर्यंत 6 लाख 1 हजार 440 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.