सध्या शारदीय नवरात्रोत्सव चालू आहे. आदिशक्तीच्या विविध रूपांची पूजाअर्चा या दिवसात केली जाते. नुकतेच आपण प्रसन्न आणि विद्यादायिनी शारदेचे अर्थात सरस्वती मातेचे रूप पाहिले आणि तिची पूजा केली. तिच्या सुंदर रूपाचे वर्णन करणारा हा श्लोक पाहू. शारदा शारदाम्भोज वदना वदनाम्बुजे। सर्व-दा सर्वदाSस्माकम् सन्निधिं संनिधिं क्रियात्।। अर्थ- वरील श्लोकात काही शब्दांची द्विरुक्ती झाली आहे. शारदा, वदना, सर्वदा, संनिधी असे सुंदर शब्द येथे आले आहेत. अम्भोज आणि अंबुज दोन्ही शब्दांचे अर्थ कमळ असे आहेत. शारदा म्हणजे सरस्वती, तर शारदाम्भोज म्हणजे शरद ऋतूत उमलणारे कमळ. वदना वंदनांबुजे म्हणजे शरद ऋतूत उगवणाऱया कमळाप्रमाणे जिचे मुख आहे, अशी शारदादेवी होय. ती सर्व-दा म्हणजे सर्व काही व सर्वदा म्हणजे नेहमी देणारी आहे. ती संनिधि म्हणजे मंगल निधी नेहमी उपलब्ध करून देणारी होवो असा श्लोकाचा अर्थ.
हे विद्यादेवी सरस्वतीचे मंगल, सात्त्विक व प्रसन्न रूप जेवढे मनाला भावते, तेवढेच अष्टमीला तिचे महालक्ष्मीचे तेजस्वी रूपही मनाला भावते. अशी ही आदिशक्ती कोणकोणत्या रूपात आपल्याला दिसते, पाहूया. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता ।नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।। या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रुपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।। या देवी सर्वभूतेषु दुर्गारूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।। या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः अशाप्रकारे ती कधी मातृरूपात, कधी लक्ष्मीच्या रूपात, कधी शक्तीच्या विविध रूपात तर कधी बुद्धीदात्री सरस्वतीच्या रूपात आपल्याला दर्शन देते. पद्म, स्कन्द इत्यादी विविध प्राचीन पुराणातून महालक्ष्मीचा उल्लेख आहे. काशीत शिवाचे वास्तव्य आहे. परंतु करवीरात शिव व महालक्ष्मी या दोघांचेही वास्तव्य आहे असे सांगतात.
कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात मोठय़ा प्रमाणात नवरात्रोत्सव साजरा होतो. नऊ दिवस देवीची विविध रूपातील पूजा बांधली जाते. अत्यंत श्रद्धेने देवीचे दर्शन घेण्यासाठी भक्तजनांचा मेळा मोठय़ा संख्येने जमतो. तिच्या कृपेने आपल्यावरील सर्व विघ्ने दूर व्हावीत आणि तिने सदैव आपल्यावर कृपादृष्टी धरावी अशी भाविक तिची प्रार्थना करतात. अशी ही आदिशक्ती अंबाबाई, जगदंबा तुम्हा आम्हा सर्वांचे कल्याण करो आणि आपल्या अंगी अनिष्ट शक्तींचे निवारण करण्याचे सामर्थ्य निर्माण करो अशी आपण तिला प्रार्थना करूया! उदयोSस्तु अंबे !