प्रतिनिधी/ पणजी
अयोध्येत राममंदिर उभारणी व निधी संकलनासाठी विश्व हिंदू परिषद गोव्यातील 500 हून अधिक गावात तसेच एकंदरीत 2 लाख कुटुंबांकडे जाणार असून त्यासाठी नामवंत उद्योगपती श्रीनिवास धेंपे यांच्या नेतृत्त्वाखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. रु. 10, रु. 100 व रु. 1000 अशा स्वरूपात देणगी/निधी संकलन होणार असून रु. 2000 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेची देणगी असल्यास त्याची पावती देण्यात येणार आहे.
विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय कार्यकारी अध्यक्ष अलोक कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना वरील माहिती दिली.
देणगी 48 तासात बँकेत जमा होणार
देणगी/निधी संकलन 48 तासात बँक खात्यावर जमा करण्यात येणार असून भारतीय स्टेट बँक, बडोदा बँक, पंजाब नॅशनल बँक यांच्या कोणत्याही शाखेत रक्कम भरण्याची सोय करण्यात आली आहे. लार्सन अँड टुब्रो कंपनीस बांधकामाचे कंत्राट देण्यात आले असून इंजिनियर्सचे काम टाटा कन्सलटन्सी देणार आहे, असे कुमार यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले की 2.7 एकर्सवर ते मंदिर उभे रहाणार असून बांधकाम क्षेत्र 57400 चौ. फूट आहे. मंदिर 3 मजली असून त्यात एकूण 5 मंडपाचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या या मंदिरात म्युझियम, वेदशाळा, सत्संग भवन, धर्मशाळा, संशोधन पेंद्र यांचा समावेश असेल.