प्रतिनिधी/ बेळगाव
उन्नती ग्रामीण आणि सामाजिक विकास संस्थेच्या महिला परंपरा कक्षातर्फे भाग्यनगर येथे संक्रांतीनिमित्त विक्री मेळावा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये विविध गृहोद्योग करणाऱया महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचा समावेश होता. या विनामूल्य मेळाव्याचे उद्घाटन स्टेट बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक मोहन पाटील यांनी केले.
यावेळी ते म्हणाले, नवउद्योजक महिलांना संधी देण्यासाठी हा मेळावा उपयुक्त ठरला आहे. एकूण 17 महिलांनी मेळाव्यात भाग घेतला. स्टेट बँकेचे उपव्यवस्थापक तंत्री यांनी मेळाव्याला भेट देऊन महिलांना बँकेच्या योजनांबद्दल माहिती दिली. हा मेळावा आयोजित करण्यासाठी प्रिया पुराणिक यांनी पुढाकार घेतला. मेळाव्यामध्ये भाज्या, खाद्यपदार्थ, गृहोपयोगी वस्तू, साडय़ा, कृत्रिम दागिने, चटण्या आणि सांबार मसाले यांच्यासह विविध वस्तूंचा समावेश होता.