अचूक बातमी “तरुण भारत”ची, शुक्रवार 14 जानेवारी 2022, सकाळी 11.15
● सातारा, कराड तालुक्यात वाढीचा आकडा जास्त
● थंडीचा कडाका वाढल्याने सर्दी,खोकल्याचे आजार
● 24 तासात वाढले 981 रूग्ण
● पॉझिटिव्हीटी रेट 18.41 वर
● उपचारार्थ रूग्ण 3193
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यात नववर्षातील पहिला मकर संक्रांतीचा सण निर्बंधांच्या चौकटीत आज साजरा होत आहे. संक्रांतीचा उत्साह कायम असला तरी कोरोना रूग्णवाढीचे सावटही सणावर आहे. जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढ होऊन उपचारार्थ रूग्णांची संख्या तीन हजारावर गेली आहे. मात्र सौम्य लक्षणे असल्याने सामुहिकरित्या त्याची तीव्रता फारशी दिसत नाही. दरम्यान शुक्रवारी आलेल्या अहवालात जिल्ह्यात 981 रूग्ण वाढले असून पॉझिटिव्हीटी रेट 18.41 वर पोहचला आहे.
कोरोनामुक्तीचा वेग मंदावला
जिल्ह्यात दैनंदिन रूग्णवाढीचा वेग 900 च्या पुढे आहे. रूग्णांच्यात सौम्य लक्षणे आढळत आहेत तर अनेकांच्यात फारशी लक्षणे दिसतही नाहीत. त्यामुळे रूग्णांना रूग्णालयात पळवापळवीची स्थिती सध्या तरी नाही. गृहविलगीकरणातील रूग्णांची संख्या जास्त असून स्थानिक प्रशासन त्यावर लक्ष ठेवून आहे. या दहा दिवसातील आकडेवारी पाहता कोरोनामुक्तीचा वेगही मंदावला आहे.
मकर संक्रांतीच्या सणावर सावट
आज जिल्ह्यात मकर संक्रांतीचा सण निर्बंधांच्या चौकटीत साजरा होत आहे. सणाच्या पार्श्वभुमीवर गर्दीच्या कार्यक्रमांना प्रशासनाने बंदी घातली आहे. शिवाय गुरूवारी सायंकाळपासून नाकाबंदी करत मास्क नसणारांवर कारवाई सुरू केली आहे. विशेषतः सातारा, कराड, फलटण, वाई या शहरात कारवाईला वेग आला आहे.
गुरूवारी जिल्हय़ात
नमुने-5,327
बाधित-981
मृत्यू-01, उशिरा नोंद -00
उपचारार्थ-3193
मुक्त-314
गुरूवारपर्यंत जिल्हय़ात
नमुने-24,18,162
बाधित-2,56,321
मृत्यू-6,505
मुक्त-2,45,905