उत्तर कोरियात उपासमारीमुळे मृत्यू – क्षेपणास्त्रांच्या परीक्षणावर 24 हजार कोटींचा खर्च
वृत्तसंस्था/ प्योंगयांग
उत्तर कोरियाबद्दल संयुक्त राष्ट्रसंघाने स्वतंत्र अहवाल प्रसिद्ध केला आहे. उत्तर कोरियात अन्न संकटामुळे लोकांनी आत्महत्या करण्यास प्रारंभ केला असल्याचे अहवालात म्हटले गेले आहे. आशियाई देश सद्यकाळात आंतरराष्ट्रीय समुदायापासून खूपच एकाकी पडला आहे. उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी दोन वर्षांपासून देशाच्या सीमा पूर्णपणे बंद करून ठेवल्या असल्याचे अहवालात नमूद आहे.
देशातील अन्न संकटाचा सर्वाधिक प्रभाव कमकुवत मुले आणि वृद्धांवर पडत आहे. मोठय़ा संख्येत लोक उपासमारीला बळी पडत आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाचे विशेष निरीक्षक थॉमस ओजिया क्विंटाना यांनी 6 वर्षांनी महासभेला स्वतःचा अंतिम अहवाल सोपविला आहे.
देशात आंदोलनावर बंदी आहे, लोक देशाबाहेर जाऊ शकत नाहीत. लोकांना तत्काळ मूलभूम सामग्रीची गरज आहे. अन्यथा देशाच्या मोठय़ा लोकसंख्येसमोर उपाशी मरण्याची वेळ येईल असे क्विंटाना यांनी म्हटले आहे.
सुमारे 2.60 कोटी लोकसंख्या असलेला उत्तर कोरिया आशियातील गरीब देशांमध्ये सामील आहे. एका अहवालानुसार उत्तर कोरिया दरवर्षी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांवर सुमारे 3.2 अब्ज डॉलर्स (सुमारे 24 हजार कोटी रुपये) खर्च करतो. देशात उपासमारीची स्थिती असताना उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्रांच्या विकासावर वारेमाप खर्च केला जातोय. उत्तर कोरियाने अलिकडेच बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे परीक्षण केले आहे. यावरून जपानमध्ये अलर्ट देण्यात आला आहे.