वृत्तसंस्था/ शारजा
सामनावीर चरिथ असालेंकाच्या नाबाद अर्धशतकाच्या बळावर लंकेने बांगलादेशचा 7 चेंडू बाकी राखत फडशा पाडला आणि आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या आपल्या मोहिमेचा विजयी प्रारंभ केला.
या सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजी दिली. बांगलादेशने 20 षटकात 4 बाद 171 धावा जमविल्या. त्यानंतर लंकेने 18.5 षटकांत 5 बाद 172 धावा जमवित सहज विजय संपादन केला.
बांगलादेशचा अष्टपैलू शकीब अल हसनने टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम करताना यापूर्वी पाकचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचा विक्रम मोडीत काढला. शकीबने रविवारच्या सामन्यात 17 चेंडूत 2 गडी बाद केले. टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशच्या शकीब अल हसनने 29 सामन्यात 41 गडी बाद केले आहेत. पाकच्या शाहीद अफ्रिदीने या स्पर्धेत 34 सामन्यात 39 बळी मिळविले होते.
रविवारच्या सामन्यात बांगलादेश संघातर्फे सलामीच्या मोहम्मद नईम आणि मुश्फिकूर रहीमने अर्धशतके झळकविली. नईमने 52 चेंडूत 6 चौकारांसह 62 तर रहीमने 37 चेंडूत दोन षटकार आणि पाच चौकारांसह नाबाद 57 धावा झळकविल्या. दासने 16 चेंडूत दोन चौकारांसह 16 तर शकीब अल हसनने 7 चेंडूत दोन चौकारांसह 10 धावा जमविल्या. अतिफ हुसेनने एक चौकारांसह 7 धावा जमविल्या. मेहमुदुल्लाने दोन चौकारांसह नाबाद 10 धावा केल्या. बांगलादेशच्या डावात दोन षटकार आणि 18 चौकार नोंदविले गेले. नईम आणि दास या सलामीच्या जोडीने 40 धावांची भागीदारी केली. नईम आणि रहीम या जोडीने तिसऱया गडय़ासाठी 73 धावांची भर घातली. लंकेतर्फे कुमारा, करूणारत्ने आणि बिनुरा फर्नांडो यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना लंकेच्या डावाला चांगली सुरूवात झाली नाही. पहिल्याच षटकांतील शेवटच्या चेंडूवर सलामीचा फलंदाज कुशल परेरा नेसून अहमदच्या गोलंदाजीवर त्रिफाळचीत झाला. त्यानंतर निशांका आणि असालेंका यांनी दुसऱया गडय़ासाठी 69 धावांची भागिदारी केली.
बांगलादेशच्या शकीब अल हसनने निशांकाचा त्रिफळा उडविला. त्याने 21 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकारांसह 24 धावा जमविल्या. शकीब अल हसनने याच षटकांतील चौथ्या चेंडूवर लंकेच्या अविष्का फर्नांडोचा खाते उघडण्यापूर्वीच त्रिफळा उडविला. हसरंगा केवळ 6 धावांवर बाद झाला. राजपक्षे आणि असालेंका या जोडीने पाचव्या गडय़ासाठी 87 धावांची भागिदारी केली. राजपक्षे अहमदच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने 31 चेंडूत 3 षटकार आणि तीन चौकारांसह 53 धावाजमविल्या. असालेंकाने 49 चेंडूत 5 षटकार आणि 5 चौकारांसह नाबाद 80 धावा जमवित आपल्या संघाला 7चेंडू बाकी ठेवून पाच गडय़ांनी विजय मिळवून दिला. लंकेच्या डावात 9 षटकार आणि 10 चौकार नोंदविले गेले. बांगलादेशतर्फे नेसूम अहमद आणि शकीब अल हसन यांनी प्रत्येकी दोन तर सैफूद्दीनने एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश 20 षटकात 4 बाद 171 (मोहम्मद नईम 62, मुश्फिकूर रहीम नाबाद 57, दास 16, शकीब अल हसन 10, मेहमुदुल्ला नाबाद 10, करूणारत्ने 1-12, बी. फर्नांडो 1-27, कुमारा 1-29).
लंका 18.5 षटकात 5 बाद 172 (असालेंका नाबाद 80, भानुका राजपक्षे 53, कुशल परेरा 1, निशांका 24, नेसूम अहमद 2-29, शकीब अल हसन 2-17, सैफूद्दीन 1-38).