ऍशेस मालिकेत पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया-इंग्लंड आमनेसामने, डेव्हिड वॉर्नर दुखापतीनंतरही खेळण्याची शक्यता, ट्रव्हिस हेडचे संघातील स्थान निश्चित
वृत्तसंस्था /ऍडलेड
यजमान ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या प्रतिष्ठेच्या ऍशेस मालिकेतील दुसरी कसोटी आजपासून (गुरुवार दि. 16) ऍडलेड ओव्हल मैदानावर खेळवली जाणार असून ऑस्ट्रेलियाचा आघाडी आणखी भक्कम करण्याचा यावेळी प्रयत्न असेल. डेव्हिड वॉर्नरला वेदना जाणवत असली तरी तो या कसोटीत खेळेल, असे संकेत आहेत. ही दिवस-रात्र कसोटी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 9.30 पासून खेळवली जाणार आहे.
यापूर्वी ब्रिस्बेनमधील गब्बा कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने एकतर्फी विजय संपादन केला, त्यावेळी डावखुऱया वॉर्नरची 94 धावांची खेळी लक्षवेधी ठरली होती. मात्र, फलंदाजी करताना दोन-एक चेंडू हातावर आदळल्यानंतर वॉर्नरला बरीच वेदना जाणवली आणि नंतर तो क्षेत्ररक्षणासाठी मैदानातही उतरला नव्हता. ऍडलेडवर दुसऱया कसोटी सामन्यापूर्वी त्याने सराव सत्रात सहभाग घेतला. पण, नेहमीच्या शैलीत तो खेळत नसल्याचे, अद्याप पूर्ण तंदुरुस्त नसल्याचे प्रकर्षाने दिसून आले.
ब्रिस्बेनमध्ये 152 धावा फटकावत पाचव्या स्थानी आपले स्थान निश्चित केलेल्या ट्रव्हिस हेडने यावेळी कसून सराव केला. येथील दुसऱया कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघात किमान एक बदल निश्चित असून दुखापतग्रस्त जोश हॅझलवूडची जागा उजव्या हाताने गोलंदाजी करणारा मध्यमगती गोलंदाज झाय रिचर्डसन घेईल, असे चित्र आहे. दिवस-रात्र कसोटीत ऑस्ट्रेलियाचे रेकॉर्ड उत्तम आहे. इंग्लंडला मात्र 4 प्रयत्नात केवळ एकदाच विजयश्री संपादन करता आली आहे. हा एकमेव विजय त्यांनी 2017 मध्ये विंडीजविरुद्ध मायदेशात मिळवला.
यंदाच्या ऍशेसमधील 2 कसोटी सामने दिवस-रात्र होतील. त्यामुळे, इंग्लंडला डे-नाईट कसोटीमधील कामगिरी सुधारण्यासाठी 2 वेळा संधी मिळेल. या मालिकेतील पाचवी कसोटी देखील दिवस-रात्र खेळवली जाणार आहे. पर्थ येथे होणारी शेवटची कसोटी कोव्हिड-19 निर्बंधामुळे होबार्ट येथे हलवण्यात आली आहे.
अँडरसन-ब्रॉड परतल्याने दिलासा
अष्टपैलू बेन स्टोक्सच्या तंदुरुस्तीबद्दल साशंकता असली तरी जेम्स अँडरसन व स्टुअर्ट ब्रॉड हे आघाडीचे जलद गोलंदाज संघात परतत असल्याने इंग्लंडसाठी या कसोटीतील ही जमेची बाजू असणार आहे. वास्तविक, पहिल्या कसोटी सामन्यावेळी ते निवडीसाठी उपलब्ध होते. पण, खेळाडूंना रोटेट करण्याच्या धोरणानुसार, त्यांचा विचार केला गेला नव्हता.
39 वर्षीय अँडरसनने मंगळवारी सराव सत्रात 40 मिनिटे वेगवान गोलंदाजी केली. इंग्लिश कर्णधार रुटने यावेळी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 5 गुणांचा दंड होण्यापेक्षा खेळाडूंना 100 टक्के मानधन कपातीचा दंड ठोठावला जाणे अधिक वेदना देणारे ठरले, असे नमूद केले. इंग्लंडला स्लो ओव्हररेटमुळे या शिक्षेला सामोरे जावे लागले होते. इंग्लंडने ऑस्ट्रेलियात मागील 11 कसोटी सामन्यापैकी 10 लढतीत पराभव पत्करले असून ही त्यांच्यासाठी आणखी एक प्रतिकूल बाब ठरु शकते.
इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स दुखापतीमुळे चिंतेत
30 वर्षीय बेन स्टोक्स सध्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे चिंतेत असून येथे महत्त्वाच्या लढतीत तो 100 टक्के तंदुरुस्त असणार का, याबद्दल अद्याप साशंकता आहे. स्टोक्सने गब्बा येथील पहिल्या कसोटीत केवळ 12 षटके गोलंदाजी केली. त्याच्यासाठी मार्चनंतर ही पहिलीच कसोटी होती. पण, तेथे आपल्या उत्तरार्धातील स्पेलमध्ये तो गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त दिसून आला. मंगळवारी सराव सत्रात त्याने पूर्ण जोशात सहभाग घेतला व इंग्लिश कर्णधार रुटने त्याच्या तंदुरुस्तीबाबत येत्या एक-दोन दिवसात सामन्यात चित्र स्पष्ट होऊ शकेल, असे नमूद केले.
पहिल्या कसोटीत आम्ही बेन स्टोक्सकडून प्रमाणापेक्षा अधिक अपेक्षा ठेवल्या आणि याचाच आम्हाला मोठा फटका बसला. आम्ही त्याला नेहमी सुपरहिरो म्हणूनच पाहिले आहे. प्रतिकूल परिस्थितीत तोच आमचा तारणहार असतो. पण, पहिल्या कसोटीत सर्व आघाडय़ांवर निराशा झाली.
-इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रुट
प्रतिस्पर्धी संघ
ऑस्ट्रेलिया :पॅट कमिन्स (कर्णधार), मार्कस हॅरिस, डेव्हिड वॉर्नर, मार्नस लाबुशाने, स्टीव्ह स्मिथ, ट्रव्हिस हेड, कॅमेरुन ग्रीन, ऍलेक्स कॅरे (यष्टीरक्षक), मिशेल स्टार्क, नॅथन लियॉन, झाय रिचर्डसन.
इंग्लंड : जो रुट (कर्णधार), रोरी बर्न्स, हसीब हमीद, डेव्हिड मलान, बेन स्टोक्स, ऑलि पोप, जोस बटलर (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, ऑलि रॉबिन्सन, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच, जेम्स अँडरसन
सामन्याची भारतीय प्रमाणवेळ : सकाळी 9.30 पासून.
थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्ट्स नेटवर्क