जग जिंकण्याचा उद्देश नसल्याचे विधान : नामीबियातील नेता
वृत्तसंस्था / विंडहॉक
नामीबिया या आफ्रिकेतील देशाच्या निवडणुकीत ऍडॉल्फ हिटलर यांचा विजय झाला आहे. परंतु हा जर्मनीचा हुकुमशहा नसून नामीबियातील राजकीय नेता आहे. यांचे पूर्ण नाव ऍडॉल्फ हिटलर उनोना आहे. ज्या भागात ऍडॉल्फ हिटलर यांना विजय मिळाला आहे, तो पूर्वी जर्मनीची वसाहत होता हे विशेष. येथील अनेक रस्ते, ठिकाणे आणि लोकांच्या नावावर आजही जर्मनीचा प्रभाव दिसून येतो. नामीबिया 1884 पासून पहिल्या महायुद्धापर्यत जर्मनीच्या नियंत्रणाखाली होता.
ऍडॉल्फ हिटलर यांनी नामीबियाच्या निवडणुकीत 85 टक्क्यांहून अधिक मतांनी विजय प्राप्त केला आहे. माझा विश्वविजयाचा कुठलाच हेतू नसल्याचे उद्गार त्यांनी थट्टेच्या सूरात काढले आहेत. ऍडॉल्फ यांना नामीबियातील सत्तारुढ एसडब्ल्यूएपीओ पक्षाच्या तिकिटावर विजय प्राप्त झाला आहे. 1990 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदापासून स्वतंत्र झाल्यापासूनच याच पक्षाने देशातील सत्ता सांभाळली आहे.
हिटलरच्या पक्षाला पुन्हा बहुमत
ऍडॉल्फ हिटलर यूनोना यांना क्षेत्रीय परिषदेच्या निवडणुकीत 1,196 मते मिळाली तर विरोधी उमेदवाराला केवळ 213 मतांवर समाधान मानावे लागले आहे. त्यांच्या एसडब्ल्यूएपीओ पक्षाने देशभरात 57 टक्के मते प्राप्त केली आहेत. परंतु यंदाच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या मतांची टक्केवारी घसरली आहे.
नाझी विचारसरणीशी संबंध नाही
जर्मनीच्या नाझी विचारसरणीशी माझे काहीच देणेघेणे नाही. माझ्या वडिलांनी जर्मनीच्या हुकुमशहावरून माझे नाव ठेवले आहे. बालपणी माझ्या नावाला सामान्य स्वरुपातच पाहिले होते. परंतु मोठा झाल्यावर हिटलर पूर्ण जगाला जिंकू पाहत होता हे उमगल्याचे त्यांनी म्हटले आहे. पत्नी मला केवळ ऍडॉल्फ किंवा ऍडॉल्फ यूनोना म्हणून हाक मारते. मी माझे नाव आता बदलू शकत नाही, कारण याला अधिकृतपणे खूपच उशीर झाल्याचे ते म्हणाले.