वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चालू वर्षांच्या अखेरीस आयोजित केलेल्या बर्मिंगहम राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा तसेच त्यानंतर होणाऱया हांगझोयु येथील आशियाई क्रीडास्पर्धेसाठी भारतीय ऍथलीट्सच्या प्रशिक्षणासाठी शासनाकडून 190 कोटी रूपये खर्च केले जाणार असल्याची माहिती क्रीडा मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली आहे.
या दोन्ही आगामी स्पर्धांसाठी केंद्रीय क्रीडामंत्रालयाने 33 क्रीडाप्रकारासाठी प्रशिक्षण आणि स्पर्धा वार्षिक वेळापत्रक तयार केले असून 2022-23 च्या आर्थिक वर्षांमध्ये देशातील विविध राष्ट्रीय क्रीडा फेडरेशनना 259 कोटी रूपयांची मदत दिली जाणार आहे. देशातील 33 राष्ट्रीय क्रीडा फेडरेशनकडून क्रीडापटूंच्या सरावासाठी खर्च करण्यात येणाऱया आर्थिक निधीला केंद्रीय मंत्रीमंडळाकडून अधिकृत मंजुरी यापूर्वी देण्यात आली आहे. भारतीय ऍथलीट्सना प्रशिक्षण, विदेशी स्पर्धांचा अनुभव, क्रीडासाहित्य तसेच साहाय्यक प्रशिक्षक वर्गावर ही रक्कम खर्च केली जाणार आहे.