न्यूझीलंडचा नेदरलँड्सवर एकतर्फी वनडे मालिकाविजय,
हॅमिल्टन / वृत्तसंस्था
मार्टिन गप्टील व विल यंग यांची उत्तुंग फटकेबाजी आणि मॅट हेन्रीच्या 4 बळींच्या जोरावर न्यूझीलंडने नेदरलँड्सचा तिसऱया व शेवटच्या वनडे लढतीत 115 धावांनी धुव्वा उडवला आणि मालिकेत क्लीन स्वीप प्राप्त केला. या लढतीच्या माध्यमातून रॉस टेलरच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची विजयी सांगता झाली.
येथील सेडॉन पार्कवर आयोजित या लढतीत न्यूझीलंडने निर्धारित 50 षटकात 8 बाद 333 धावांचा डोंगर रचला. विल यंगने 120 तर मार्टिन गप्टीलने 106 धावांचे योगदान दिले. नेदरलँड्सतर्फे क्लेटॉन फ्लॉईडने 41 धावात 2 बळी घेतले. प्रत्युत्तरात नेदरलँड्सचा डाव अवघ्या 218 धावांमध्येच आटोपला. स्टीफन मायबर्गने 64, लॉगन व्हान बीकने 32 धावांचे योगदान दिले. किवीज संघातर्फे मॅट हेन्रीने 36 धावात 4 बळी घेतले. याशिवाय, डग ब्रेसवेलने 23 धावात 2 तर काईल जेमिसन, मायकेल ब्रेसवेल, कॉलिन ग्रँडहोम व ईश सोधी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड ः 50 षटकात 8 बाद 333. (विल यंग 112 चेंडूत 6 चौकार, 4 षटकारांसह 120, मार्टिन गप्टील 123 चेंडूत 11 चौकार, 2 षटकारांसह 106, क्लेटॉन फ्लॉईड 2-41) वि. नेदरलँड्स ः 42.3 षटकात सर्वबाद 218 (स्टीफन मायबर्ग 64, लॉगन व्हान बीक 32. मॅट हेन्री 4-36).