ऍमेझॉनवर औषधांची मागणी शक्मय : पायलट प्रोजेक्टच्या स्वरुपात सेवेचा प्रारंभ
वृत्तसंस्था/ बेंगळूर
ई कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी ऍमेझॉन इंडिया आता ग्राहकांना आपल्या सेवेतून औषधांचा पुरवठा करणार आहे. यांच्यासाठी कंपनीने ऍमेझॉनच्या प्लॅटफार्मवर फार्मसी डिलीवरी सुविधेचा प्रारंभ केला आहे. सदर सेवेचा प्रारंभ हा बेंगळूर येथे केला असून ही सुविधा पायलट प्रोजेक्टच्या स्वरुपात सादर करण्यात आल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
सध्या कोरोना महामारीच्या कारणामुळे लोक इस्पितळात जाण्यास घाबरत आहेत. यामुळे अनेकजण ऑनलाईन मार्गाचा वापर करुन अनेक गोष्टींची ऑर्डर देत असतात. परंतु हा आरोग्याशी संबंधीत विभाग सुरु केल्याने येत्या काळात देशातील विविध शहरांमध्ये आपल्या सेवेचा विस्तार करणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
आताच्या घडीला या आगोदर कधी न झालेली आरोग्यविषयक जागृती होत असल्याचे चित्र कोरोनामुळे पहावयास मिळत आहे. यामुळे ऑनलाईन सेवा मोठय़ा प्रमाणात तेजीत आल्याचे मागील चार महिन्यापासून पहावयास मिळाले आहे. यामध्ये आता ग्राहक ऑनलाईन कंसल्टेशन, उपचार, मेडिकल तपासणी आणि औषधांची डिलीवरी आदींना महत्व देत आहेत. यामुळेच प्रॅक्टो, नेटमेड्स, 1 एमजी, फार्मा, ईजी आणि मेडलाईफ यासारख्या स्टार्टअपकडे ऑनलाईन सेवेला मागणी वाढली आहे.