वृत्तसंस्था/ लंडन
चालू वर्षअखेर ऑस्ट्रेलियात होणाऱया ऍशेस मालिकेसाठी इंग्लंड संघात अष्टपैलू बेन स्टोक्सचा समावेश करण्यात आला आहे. मध्यंतरी त्याची मानसिक अस्वास्थाचे कारण देत त्याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून अनिश्चित कालावधीसाठी विश्रांती घेतली होती. ऑस्ट्रेलियात होणाऱया ऍशेस मालिकेसाठी आपण सज्ज असल्याचे स्टोक्सने इंग्लंडच्या निवड समितीला कळविल्याने त्याचा संघात समावेश करण्यात आला.
आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात खेळताना स्टोक्सच्या हाताच्या बोटाचे हाड मोडले होते. ही दुखापत गंभीर स्वरूपाची झाल्याने देखील तो चिंतेत होता. गेल्या जुलैपासून स्टोक्स क्रिकेटपासून अलिप्त राहिला. स्टोक्सवर उपचार करणाऱया डॉक्टरांनी त्याला ऍशेस मालिकेत खेळण्यास परवानगी दिली आहे. स्टोक्सच्या हाताच्या बोटावर दुसऱयांदा यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. स्टोक्स आता 4 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. या दुखापतीमुळे स्टोक्सला संयुक्त अरब अमिरात सध्या सुरू असलेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत खेळता आले नाही. आगामी ऍशेस मालिकेत पाच कसोटी सामने खेळविले जाणार असून पहिली कसोटी ब्रिस्बेनमध्ये होणार आहे.